नवी दिल्ली :- 21 जुलै 2024 रोजी संध्याकाळी भारतीय नौदल जहाज ब्रह्मपुत्रा या बहु-भूमिका असलेल्या युद्धनौकेला एनडी (एमबीआय) येथे रिफिट करत असताना आग लागली. मुंबई येथील नौदल डॉकयार्ड, {एनडी (एमबीआय)} आणि बंदरातील इतर जहाजांच्या अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने जहाजाच्या इतर कर्मचाऱ्यांनी 22 जुलै 2024 रोजी सकाळपर्यंत आग आटोक्यात आणली. यानंतर, आगीच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि निर्जंतुकीकरण तपासणीसह पुढील प्रक्रिया करण्यात आल्या.
यानंतर, दुपारच्या सुमारास, जहाज एका बाजूला (पोर्टच्या बाजूला) वाकले होते. सर्व प्रयत्न केल्यानंतरही जहाज सरळ स्थितीत आणता आले नाही. जहाज सध्या त्याच्या धक्क्याजवळ अधिक वाकलेले आहे आणि एका बाजूला टेकून आहे.
सर्व कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे, परंतु एक कनिष्ठ नाविक अद्यापही बेपत्ता असून त्याच्यासाठी शोधकार्य सुरू आहे. त्याचबरोबर या घटनेच्या चौकशीसाठी भारतीय नौदलाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.