अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा थेट आरोप

मुंबई :-भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनमुक्तीचा सोहळा साजरा करत होते. भ्रष्टाचाऱ्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेली आहे, अशी कठोर टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

देशमुख यांना प्रकृतीच्या कारणावरून याचना केल्यामुळे न्यायालयाने जामिनावर सोडले असताना, तुरुंगाबाहेर येणाऱ्या देशमुखांना स्वातंत्र्ययोद्ध्यासारखा सन्मान देत त्यांची मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचाराने बरबटलेला चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे, असेही उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप झाला, तेव्हाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सरकार त्यांना पाठीशी घालत होते. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत असताना त्यामध्ये गुंतलेल्यांची पाठराखण करत खुद्द उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत होते. गुंडगिरी, मारहाण, भ्रष्टाचार, खून असे आरोप असलेल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बचावासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लावली जात होती. तरीही अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत आदी नेत्यांना गजाआड जावेच लागले.

संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने आरोपमुक्त केलेले नाही, त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही, तर ते जामिनावर बाहेर आले आहेत. याआधी छगन भुजबळ हेदेखील जामिनावरच मुक्त झालेले असून त्यांनाही आरोपमुक्त करण्यात आलेले नाही. आरोपांचे डाग ढळढळीतपणे कपाळावर मिरविणाऱ्या या नेत्यांचे उदात्तीकरण करून त्यांच्या मिरवणुका काढण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्कृतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणास काळीमा लागला आहे, असे ते म्हणाले.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या नेतृत्वाखालील सरकार सभ्यतेची आणि सुशासनाची नवी संस्कृती रुजवू पाहात आहे. लोकायुक्त कायदा करून भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. विरोधकांचा सन्मान करण्याची संस्कृतीही रुजू पाहात आहे. त्यातूनच सौजन्याने सरकारने दिलेल्या विमान प्रवासाच्या सवलतीचा गैरफायदा घेऊन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जामिनावर मुक्तता झालेल्या अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी हजर राहणे व त्यांच्या मिरवणुकीत सहभागी होणे या प्रकाराचा भाजपा तीव्र निषेध करत आहे, असेही ते म्हणाले. जामिनावर मुक्त झालेल्या आरोपीच्या स्वागतास व मिरवणुकीस हजर राहण्यासाठी सरकारची दिशाभूल करून सरकारी विमानाचा गैरवापर केल्याप्रकरणी अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणीही उपाध्ये यांनी केली. अनिल देशमुख, संजय राऊत आदी नेते आरोपी आहेत. त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. त्यामुळे पुन्हा त्यांना तुरुंगात जायची वेळ येईल, तेव्हा पुन्हा मिरवणुकीने त्यांची पाठवणी करणार का, असा खोचक सवालही त्यांनी केला.

 

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com