केळीबाग रोडच्या रुंदीकरणामुळे शहराचे ऐतिहासिक वैभव दृष्टीपेक्षात

महालात पुरातन रिद्धी-सिद्धी गणेश मंदिर आणि मुरलीधर मंदिराची भर

नागपूर :-  सुमारे तिनशे वर्षांहून अधिकचा प्रगल्भ इतिहास लाभलेल्या नागपूर शहरात अनेक वारसास्थळे आहेत, जी हल्ली नानाविध समस्यांमुळे दृष्टीआड गेली आहेत. ब्रिटिश काळात एका इंग्रज अधिकाऱ्याने नागपूर शहराचा उल्लेख तलाव, मंदिर आणि उद्यानाचे सुंदर शहर म्हणून केला होता. नाग नदीच्या तिरावर वसलेले हे नागपूर शहर आजही आपल्या ऐतिहासिक इमारती आणि मंदिरांसाठी विख्यात आहे. अशात महाल परिसरातील केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी हटविण्यात आलेल्या व्यावसायिक प्रतिष्ठानांमुळे महाल परिसराचा समृद्ध इतिहास पुन्हा दृष्टीक्षेपात आला आहे.

नागपूर नगरी वसविणारे गोंड राजे बख्त बुलंद शहा आणि भोसले कुटुंबियांचा नागपूर शहराच्या निर्मितीत मोठा वाटा आहे. त्यामुळे भोसलेकालीन आणि ब्रिटिशकालीन वास्तू शहरात मोठ्या प्रमाणावर आढळतात. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नागपूर शहरात अनेक ऐतिहासिक वास्तूही आहेत. ज्यात हेरिटेज दर्जा प्राप्त असणारी अनेक ठिकाणे, ऐतिहासिक इमारती, स्मारके, तलाव आणि उद्याने शहरातील विविध भागांमध्ये आहेत. त्यातील काही स्थळांबाबत सर्वसामान्य नागरिकांना विशेष माहिती नाही.

नागपूरकर भोसले राजांनी तत्कालीन शहरात विविध मंदिरांची निर्मिती केली होती. परंतू, मागील काही दशकांमध्ये वाढलेल्या व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या व्यापामुळे ही मंदिरे हळुहळू दृष्टीआड गेली. उंच इमारती आणि दुकाने, प्रतिष्ठानांमुळे या मंदिरांचे अस्तित्व संपूष्टात आल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र काही वर्षांपूर्वी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे केळीबाग मार्गावरील दुकाने, प्रतिष्ठाने आणि इतर बांधकाम हटविण्यात आले आणि नागपूर शहराचे वैभव असलेला हा वारसा पुन्हा एकदा दृष्टीपथावर आला. बांधकाम हटविण्यात आल्याने महाल परिसरात आता अनेक पुरातन मंदिरांचे दर्शन होत आहे.

महाल स्थित कोतवाली पोलिस ठाण्याच्या संरक्षक भिंतीला लागून एक रिद्धी-सिद्धी गणेश हे पुरातन मंदिर आहेत. तर ठिक या मंदिराच्या विरुद्ध दिशेला मुरलीधर हे पुरातन मंदिर आहे. या दोन्ही मंदिराच्या अवतीभोवतीच्या दुकानांमुळे हे मंदिर वेढले जाऊन दिसेनासे झाले होते. भोसलेकालीन मुरलीधर मंदिर, रिद्धी सिद्धी गणेश मंदिर, महादेव मंदिर, महालक्ष्मी मंदिर, शिरपूरकर राम मंदिर, जैन मंदिर हे दुमजली दुकानांच्या विळख्यात अडकल्याने या मार्गावरून दिसत नव्हते. कोतवाली पोलिस ठाण्याच्या अगदी समोर रस्ता रुंदीकरणासाठी दुकानांची ओळ हटविण्याची कारवाई झाल्यानंतर दुमजली दुकानांच्या विळख्यात अडकलेले हे भोसलेकालीन मंदिर दृष्टिक्षेपात आले आहे.

ही दोन्ही मंदिरे ऐतिहासिक असून, हेरिटेज श्रेणीत मोडतात. ही मंदिरे जवळपास पाऊणेतीनशे वर्ष जुनी असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. बाकाबाईचा वाडा अर्थात सध्याचे कोतवाली पोलिस ठाणे हे या मंदिराला लागून आहे. रिद्धी-सिद्धी गणेश मंदिर परिसरात महादेवाचे प्राचीन मंदिरही आहे. तसेच येथे आबाजी महाराज यांची समाधी असल्याचे स्थानिक सांगतात. याशिवाय परिसरात शेकडो वर्ष जुनी एक बावडी विहिर आहे. ज्यात गुप्त दरवाजा असल्याचे काही ज्येष्ठ नागरिक सांगतात. या मंदिराच्या समोर असलेल्या काळ्या दगडांनी तयार केलेले मुरलीधर मंदिर आहे. मंदिराच्या चारी बाजूंनी सुबक असे कोरिव काम करण्यात आले आहे. अनेक मूर्ती दगडात कोरण्यात आल्या आहेत. तसेच केळीबाग मार्गावर महालक्ष्मी मंदिर आहेत. जे रस्ता रुंदीकरणामुळे प्रखरपणे दिसून येत आहेत. या समृद्ध इतिहासाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी आणि या ऐतिहासिक वास्तूंचे योग्य जतन व्हावे याकरिता मनपा प्रशासन कार्य करीत आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Thu Oct 13 , 2022
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.12) 03 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 12 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights