सावनेर पोलीस प्रशासकीय इमारत व पोलीस निवासस्थानाचे लोकार्पण
अद्ययावत पोलीस प्रशासकीय इमारतीमुळे सावनेरच्या सौदर्यात भर
या परिसरातील कॅम्युनिटी हॉल बांधकामास मान्यता
नागपूर : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवतानाच जनतेची कामे सुलभ व्हावीत. या नूतन इमारतीमुळे कार्यक्षमता वाढून गतीने काम करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.
सावनेर येथील सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेल्या पोलीस प्रशासकीय इमारत व पोलीस निवासस्थानाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील होते.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, पशुसंवर्धन व कृषी सभापती तापेश्वर वैद्य, महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोंढारे, पोलीस गृहनिर्माण कल्याण मंडळाचे महासंचालक विवेक फणसळकर, अपर पोलीस महासंचालक
अर्चना त्यागी, पोलीस उप महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजय मगर आदी उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची उत्तम जबाबदारी सांभाळत असताना विभागाने निष्पक्ष काम करताना द्वेषभावना न ठेवता व समाजात तेढ निर्माण होईल, असे न वागता सामोपचाराने काम करण्याच्या सूचना करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पोलीस प्रशासकीय इमारत सावनेरच्या सौदर्यात भर घालणारी आहे. सर्वसामान्य जनतेला उत्कृष्ट सेवा मिळेल या दृष्टीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे काम करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील पोलीस विभागाची परंपरा व नावलौकिक संपूर्ण देशभर आहे आणि ते वेळोवेळी सिद्ध झाले आहे. राज्याची उज्ज्वल परंपरा कायम ठेवून सर्वांनी काम करावे, असेही ते म्हणाले.
कोरोना महामारीमध्येही विकासकामांना खिळ बसू दिली नाही. नवीन पायाभूत सुविधा निर्माण केल्या. त्याचबरोबर राज्यातील पोलीस विभागाच्या इमारत बांधकामास सुध्दा निधीची कमतरता पडू दिली नाही. त्यामुळे आज ही इमारत उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस प्रशासकीय इमारत व निवासस्थानाच्या ठिकाणी कॅम्युनिटी हॉल बांधण्यास मंजुरी देण्यात येत असून यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. सतत विकासाचा ध्यास ठेवल्यामुळे ही प्रशासकीय इमारत व इतर सोयी सुविधा पूर्ण करण्यात आल्या. पोलिसांनी प्रामाणिकपणे काम करुन जनतेस सौजन्याची वागणूक द्यावी, असे ते म्हणाले. पोलिसांना एक लाख घरे बांधून देण्याचा महाविकास आघाडीचा मानस आहे. पोलीस विभागास घरासाठी शासनातर्फे गृहकर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले
पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासंदर्भात बोलताना गृहमंत्री म्हणाले की, 5 हजार 200 पोलिसांची भरतीप्रक्रिया पूर्ण होत असून दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. राज्यातील जुन्या व मोडकळीस आलेल्या पोलीस स्टेशनच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. पोलिसांना गृहनिर्माणासाठी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
समाजातील विविध घटकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.
पोलीस प्रशासकीय इमारत व निवासस्थानात एक कॅम्युनिटी हॉल बांधण्यात यावा. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना सांस्कृतिक व इतर कार्यक्रम करण्यास सोयीचे होईल असे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार म्हणाले. पोलीस व नागरिक यांच्यामध्ये सहकार्याची भूमिका असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सावनेर येथील कोची मध्यम प्रकल्पाच्या उर्वरित बांधकामासाठी निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यामुळे नागपूरसाठी हा प्रकल्प भगीरथ योजना म्हणून कायमस्वरुपी होईल. नागपूरच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असेही त्यांनी सांगितले. सावनेर तालुक्यातील ट्रामा सेंटरसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी केली.
पोलीस अधीक्षक(ग्रामीण ) विजय मगर यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात पोलीस प्रशासकीय इमारत व निवासस्थानाच्या नवीन इमारतीसंदर्भात माहिती दिली. या इमारतीमध्ये पोलीस विभागाच्यासंबंधी सुविधा उपलब्ध असून 1674 चौरस फूट जागेवरील इमारतीसाठी 27 कोटी 54 लाख खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पोलीस प्रशासकीय इमारत व निवासस्थानाच्या कोनशिलेचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
00000