मुंबई :- सातारा जिल्ह्यात पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. येथील पर्यटन स्थळांचा विकास करून पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे आकर्षिक करता येईल. जावळी तालुक्यातील मुनावळे येथील कोयना जलाशयाच्या तीरावर जलपर्यटन प्रकल्प विकसित करण्यासाठी तातडीने कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
मंत्रालयीन दालनात आज आयोजित बैठकीत मंत्री देसाई बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक जयश्री भोज, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ व कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळामध्ये सामंजस्य करार करण्यात यावा. या कराराचा मसुदा तयार करावा. बोटींग, स्कूबा डायव्हींग, हाऊस बोट, बोट क्लब, जेटस्की आदी अत्याधुनिक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात. यासाठी कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी सातारा, पर्यटन विकास महामंडळ यांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री देसाई यांनी दिले. बैठकीला विभागांचे अधिकारी उपस्थित होते.