नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी, 2023 रोजी तेरावा राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मुंबईत होणा-या राज्यस्तरीय कार्यक्रमादरम्यान मतदार नोंदणी व जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट काम करणारे नागपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षभरात राज्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जन जागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिका-यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यात उभयतांचा समावेश आहे. सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अकरा ते दुपारी दीड या कालावधीत पाटकर सभागृह, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ (एस.एन.डी.टी. विद्यापीठ), चर्चगेट, मुंबई येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.