विधानपरिषद निवडणुकीचा प्रचार संपला..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

सोमवारी सकाळी ८ ते ४ मतदान ;२ फेब्रुवारीला मतमोजणी 

कामठी ता प्र दि.२८ : विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज शनिवारी सायंकाळी चार वाजता थंडावल्या. उद्या सोमवार दिनांक 30 रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे.

जिल्हा निवडणूक प्रशासनाने सायंकाळी चार नंतर कोणीही प्रचार करू नये,अशा प्रकारचा प्रकार कुठे आढळल्यास कडक कारवाई करावी, उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचा भंग करू नये, मतदार, उमेदवार, मतदान मोहिमेतील शासकीय अधिकारी कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी या सर्वांसाठी निवडणूक आयोगाने सुस्पष्ट सूचना दिल्या आहेत. काय करावे, काय करू नये याबाबतचे नियम स्पष्ट आहेत. शांततेने निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा साहायक निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

अजनी येथे होणार मतमोजणी

उद्या 29 जानेवारी रोजी अजनी येथील सामुदायिक भवन येथून पोलिंग पाटर्या रवाना होणार आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून जिल्ह्यातील ४३ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी साहित्य घेऊन कर्मचारी जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये जवळपास अडीचशे कर्मचारी जिल्ह्यात काम करीत आहे. अजनी रेल्वे स्थानकाजवळील सामुदायिक भवन या ठिकाणी सुरक्षा भवन ( स्ट्राँग रूम ) उभारण्यात आले असून ३० तारखेला मतपेट्या या ठिकाणी जमा होणार आहे.२ फेब्रुवारीला याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. माध्यमांसाठी या ठिकाणी कक्ष उभारण्यात आला आहे.

एकूण २२ उमेदवार

विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणुकीमध्ये एकूण 22 उमेदवार रिंगणात आहेत.यामध्ये सतीश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष ) प्रा.दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी पक्ष),देवेंद्र वानखडे (आम आदमी पक्ष) राजेंद्र झाडे समाजवादी पक्ष (युनायटेड ), अजय भोयर अपक्ष, सुधाकर अडबाले अपक्ष, सतिश इटकेलवार अपक्ष, बाबाराव उरकुडे अपक्ष, नागो गाणार अपक्ष, रामराव चव्हाण अपक्ष,रवींद्रदादा डोंगरदेव अपक्ष, नरेश पिल्ले विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष, निमा रंगारी बहुजन समाज पक्ष, नरेंद्र पिपरे अपक्ष, प्रा. प्रवीण गिरडकर अपक्ष , इंजिनिअर प्रो. सुषमा भड अपक्ष, राजेंद्र बागडे अपक्ष, डॉ.विनोद राऊत अपक्ष,उत्तमप्रकाश शहारे अपक्ष, श्रीधर साळवे अपक्ष, प्रा सचिन काळबांडे अपक्ष, संजय रंगारी अपक्ष अशा एकूण २२ उमेदवारांचा सहभाग आहे.

६ जिल्हयात १२४ मतदान केंद्र

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील पात्र शिक्षक या निवडणुकीत आपले उमेदवार निवडणार आहेत. नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये 124 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी नागपूर जिल्ह्यात 43, वर्धा जिल्ह्यात 14, भंडारा 12, गोंदिया 10, चंद्रपूर 27 व गडचिरोली जिल्ह्यात 18 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

शिक्षकांना नैमित्तिक रजा मंजूर

या निवडणुकीत पात्र शिक्षक मतदान करू शकणार आहे. त्यासाठी 30 जानेवारी रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना अनुज्ञ असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त ही रजा असणार आहे. उद्या फक्त ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे. त्याच शाळाना सुटी आहे. अन्य ठिकाणी नियमित शाळा सुरू असतील.शाळेच्या वेळा व ईतर संनियंत्रणाबाबत मुख्याध्यापक आपले स्तरावर निर्णय घेतील.

नागपूर जिल्हयातील मतदान केंद्र

नागपूर जिल्ह्यातील पात्र मतदारांची संख्या 16480 इतकी आहे. जिल्ह्यात एकूण 43 मतदान केंद्र आहेत. यामध्ये भारशिंगी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत, मोवाड येथे लोकसत्ता रोटरी प्राथमिक शाळा नगर परिषद शाळा, नरखेड येथे पंचायत समिती इमारत, केळवद येथे भीमराव बापू देशमुख आदर्श विद्यालय, रामटेक येथे तहसील कार्यालय, पवनी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पारशिवनी येथे तहसिल कार्यालयाची इमारत, खापा येथे नगरपरिषद इमारत, सावनेर येथे नगर परिषद सुभाष प्राथमिक शाळा, मोहपा येथे नगर परिषद कार्यालयाची इमारत, काटोल येथे तहसिल कार्यालय, कोंढाळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कळमेश्वर येथे तहसिल कार्यालय, खापरखेडा येथे दयानंद अँग्लो वैदिक प्राथमिक शाळा, कोराडी येथे विद्या मंदीर ज्युनियर कॉलेज, कामठी येथे तहसिल कार्यालय इमारत, कन्हान येथे नगर परिषद बचतभवन इमारत, मौदा येथे तहसिल कार्यालय इमारत, कोदामेढी येथे जिल्हा परिषद शाळा व ज्युनियर कॉलेज, नागपूर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक ८६ या मतदान केंद्रासाठी सिव्हील लाईन येथील नागपूर महानगरपालिकेची इमारत, प्रभाग क्रमांक ८४ साठी म.न.पा.हिंदी प्राथमिक शाळा गांधीनगर, प्रभाग क्रमांक १९ साठी पोलिस लाईन टाकळी म.न.पा. प्राथमिक शाळा, मेकोसाबाग येथे कामठीरोडवरिल नागसेन विद्यालय इमारत, प्रभाग क्रमांक ७१ साठी श्रीमती तुलसीदेवी रामरतन सारडा इंग्लिश प्राथमिक शाळा लकडगंज, प्रभाग क्रमांक ३६ साठी न्यु नंदनवन येथील म.न.पा. मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १, प्रभाग क्रमांक ९४ साठी इतवारी हायस्कुल इमारत (वेस्ट विंग), वार्ड क्रमांक ११६ साठी न्यु इंग्लिश शाळा महाल, प्रभाग क्रमांक ३८ साठी सक्करदरा येथील मोहता सायन्स कॉलेजचे खोली क्रमांक १ व खोली क्रमांक २ तसेच बिंझानी सिटी कॉलेजच्या पूर्व बाजूची खोली क्रमांक १० व खोली क्रमांक ११, प्रभाग क्रमांक १०३ साठी पंडीत बच्छराज व्यास विद्यालय, प्रभाग क्रमांक ८० साठी माऊंट कारमेल गर्ल्स हायस्कूल, प्रभाग क्रमांक ४६ साठी ज्युपिटर हायस्कूल सावरकर नगर चौक, हिंगणा येथे पंचायत समिती कार्यालय, नागपूर ग्रामीण साठी तहसिल कार्यालय (ग्रामीण) इमारत सिव्हील लाईन, बुटीबोरी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुही येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मांडळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, उमरेड येथे नगर परिषद कार्यालय, बेला येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिरसी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, भिवापूर येथे तहसिल कार्यालय इमारत येथील खोली क्रमांक १ मध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

१ आकडा महत्वाचा

सुशिक्षित मतदारांची संख्या असणाऱ्या या निवडणुकीत निवड प्रक्रिया ही पसंती क्रमावर अवलंबून असते. जेवढे उमेदवार असतील त्या सर्वांना पसंती क्रमांक देणे आवश्यक असते. मात्र यातील मॅजिक फिगर एक हा आकडा ( १ ) असतो. एक आकडा घातलेला नसेल. एक आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला असेल. एक हा आकडा तो कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी घातलेला आहे, याबद्दल संदेह निर्माण होईल अशा प्रकारे घातलेला असेल. एकाच उमेदवाराच्या नावासमोर एक आकड्यासोबत आणखीन दोन-तीन आकडे देखील घातलेले असतील. पसंती क्रमांक आकड्या ( १ ) शब्दांमध्ये ( एक ) असा दर्शवला असेल किंवा मतदाराची ओळख पटू शकेल अशी एखादी खूण मतपत्रिकेवर केली असेल तर तुमचे मतदान अवैध ठरते. या निवडणुकीत जांभळ्या रंगाच्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही साधनाने आकडा टाकल्यास मतपत्रिका अवैध ठरते. त्यामुळे शिक्षकांच्या या निवडणुकीत मतदारांनी योग्य पद्धतीने मतदान करण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव

मतदारांनी मतदान करायला जाताना सोबत मोबाईल फोन, पेन, पेन कॅमेरा, अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट घेऊन जाऊ नये. कोणत्याही आक्षेपार्ह वस्तूंना आत मध्ये घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com