नागपूर : समाज कल्याण विभाग हा समाजातील वंचित व दुर्बल घटकांसाठी काम करतो. त्यांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सातत्याने प्रयत्नशील असतो. अशा घटकांपर्यंत समाज कल्याण विभागाच्या योजना पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम शिबिराद्वारे करण्यात येत असते. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी गुमथळा येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात मार्गदर्शन करताना केले.
स्वामी विवेकानंद समाजकार्य महाविद्यालय नागपूर द्वारा गुमथळा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे औचित्य साधून त्यांनी गुमथळा येथील ग्रामवासीयांसोबत चर्चा केली. त्यांना समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देऊन सर्व योजना समजावून सांगितल्या तसेच सर्व ग्रामवासीयांनी समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
शिबिराप्रसंगी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या संशोधन अधिकारी आशा कवाडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी देखील ग्रामवासीयांना सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी रोशनी गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होत्या.