- चार वर्षाच्या चिमुकलीसह 75 वर्षांच्या आजीबाईंचा सहभाग
- सुमारे 35 हजार महिलांनी घेतला सहभाग
- पाच किलोमीटर स्पर्धेत प्राजक्ता गोडबोले प्रथम
- तीन किलोमीटर स्पर्धेत भाग्यश्री महल्ले विजेती
- पालकमंत्री, क्रीडामंत्री यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण
- दोन किलोमीटरच्या ‘फन रेस’ मध्ये माय-लेकींची धमाल
नागपूर, दि. 13: ‘ब्रेक द बायस’ अर्थात स्त्री-पुरुष समानतेचा जागर करण्यासाठी आई व मुलगी, तसेच विविध वयोगटातील महिलांनी आज नागपूर येथे महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेवून नारीशक्तीमध्ये असलेला प्रचंड आत्मविश्वासाची ग्वाही दिली.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘ब्रेक द बायस’ तसेच ‘दौड समतेची व महिला सुरक्षिततेची’ या विशेष महामॅरेथॉनचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. कस्तुरचंद पार्क येथून सकाळी सात वाजता सुरु झालेल्या या महामॅरेथॉनमध्ये विविध गटातील सुमारे 35 हजार महिलांनी आपला सहभाग नोंदवत महामॅरेथॉन पूर्ण केली.
‘ब्रेक द बायस’ या महामॅरेथॉनच्या पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राजक्ता गोडबोले प्रथम आली, तसेच तीन किलोमीटरच्या स्पर्धेत भाग्यश्री महल्ले हिने बाजी मारली. दोन किलोमीटरच्या माय-लेकींच्या स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांमधून ड्रॉ पद्धतीने दहा विजयी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. महिला बचत गटातील सहभागी महिलांमधून विजेत्या महिलांची नावे जाहीर करण्यात आली.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, खासदार विकास महात्मे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, महिला महामॅरेथॉनच्या आयोजन प्रमुख तथा जिल्हाधिकारी आर. विमला आदींनी हिरवी झेंडी दाखवून पाच किलोमीटर स्पर्धेला सुरुवात केली. या स्पर्धेमध्ये मुलींनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला होता. कस्तुरचंद पार्क तसेच संविधान चौक नारीशक्तीच्या उपस्थितीमुळे फुलून गेला होता. चौकाच्या परिसरात नारीशक्तीचे प्रतिक असलेल्या विविध नामवंत महिलांची छायाचित्रे ठळकपणे लावण्यात आली होती.
महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या महामॅरेथॉनची तीन गटात विभागणी करण्यात आली होती. पहिल्या गटात पाच किलोमीटर धावणे, दुसऱ्या गटात तीन किलोमीटर तसेच सर्वसाधारण व ज्येष्ठ महिला, तसेच आई व मुलगी यांच्यासाठी दोन किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या दोन ते चार वर्षापासून तर 75 वर्षांपर्यंतच्या महिलांचा सहभाग हे या महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य होते. आंतरराष्ट्रीय बॉक्सर कुमारी अल्फिया पठाण, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू कोमल झांजड, चार वर्षीय धावपटू आर्या टाकोने, तसेच जगातील सर्वात कमी उंचीची म्हणून नोंद झालेली ज्योती आमगे ही महामॅरेथॉनची प्रमुख आकर्षण ठरली. जिल्हा प्रशासनातर्फे कस्तुरचंद पार्क तसेच संविधान चौकात करण्यात आलेल्या विशेष व्यवस्थेमुळे तसेच चोख बंदोबस्तामुळे नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या अशा प्रकारची महिला महामॅरेथॉन यशस्वी झाली आहे. मानसिकता बदलविण्यासाठी आयोजित या महिलांच्या मॅरेथॉनसाठी माझी मेट्रोने स्पर्धा काळात मोफत प्रवासाची सुविधा दिली होती. त्यामुळे कस्तुरचंद पार्क वर महिलांना पोहचायला सुविधा झाली. या स्पर्धेत शाळकरी मुलींसोबत त्यांच्या आईंचा सहभाग लक्षणीय होता. या स्पर्धेचे अल्पावधीत नियोजन करून ती यशस्वी करण्यात जिल्हाधिकारी आर. विमला यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे.
महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महामॅरेथॉनला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर बक्षीस वितरण समारंभात मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानतेची शिकवण दिली. तसेच महिलांना समानतेचा अधिकार दिला. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुलींना शिकवणे आणि स्वावलंबी करणे तसेच त्यांच्यामध्ये समतेची व सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, हा या महामॅरेथॉनचा उद्देश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
तू मुलगी आहेस, तू स्पर्धेत उतरून जिंकू शकतेस, हा आत्मविश्वास आजच्या महामॅरेथॉनमुळे निर्माण झाला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, प्रशासन, राजकारण, क्रीडा आदी सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले, जिल्हा प्रशासनाने महिलांच्या महामॅरेथॉनचे आयोजन करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. याची सुरुवात नागपूरपासून होत आहे. नारीशक्ती ही देशाची शक्ती आहे आणि हीच शक्ती देशाला पुढे नेणारी ठरणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेवून महिलांनी विविध क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करावी, असे आवाहन श्री. केदार यांनी यावेळी केले.
महामॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकमंत्री डॉ. राऊत व क्रीडा मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आर. विमला यांचा यावेळी विशेष स्वागत करण्यात आले. यावेळी पानिपत (हरियाणा) येथील निवृत्त सनदी अधिकारी सुमिधा कटारिया उपस्थित होत्या. ‘ब्रेक द बायस’ यावर आधारित गीत मोनिका सलुजा यांनी तयार केले. त्याला कुरुक्षेत्र येथील गायक विकास रेलहन स्वरबद्ध केले. या गाण्याचा जल्लोष संपूर्ण कार्यक्रमात दिसून आला. हे गीत महामॅरेथॉनचे ‘थीम सॉंग’ होते.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महामॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना तसेच महिलांना यावेळी सामुहिक शपथ देण्यात आली. भारतीय संविधानाला अपेक्षित असलेली स्त्री-पुरुष समानता असलेला समाज निर्माण करणे, तसेच महिलांसाठी भेदभाव विरहीत, सुरक्षित समाज निर्मितीचा सामुहिक संकल्प करण्याची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.
झुम्मा डान्सवर क्रीडामंत्री थिरकले.
महामॅरेथॉनचे आयोजन करताना युवती व महिलांमध्ये जोश निर्माण व्हावा, यासाठी कस्तुरचंद पार्कवर विशेष झुम्मा डान्सचे सामुहिक आयोजन केले होते. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी आर. विमला तसेच हजारो महिलांची पावले झुम्मा डान्सवर थिरकत होती. क्रीडा मंत्र्यांनीही झुम्मा डान्समध्ये सहभागी होत युवतींमध्ये जोश निर्माण केला. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी महिलांमध्ये मिसळून त्यांच्यासोबत आनंद घेतला.
पाच किलोमीटर स्पर्धेतील विजेत्या (अनुक्रमे 1ते 10)
प्राजक्ता गोडबोले, निकीता राऊत, प्राची गोडबोले, मिताली भोयर, स्नेहल जोशी, स्वाती बंचबुध्दे, मधुरा पहाडे, प्रणाली बोरेकर, प्राजक्ता मालखेडे, स्वराली ठाकरे.
तीन किलोमीटर स्पर्धेतील विजेत्या (अनुक्रमे 1ते 10)
भाग्यश्री महल्ले, रिया धोधरे, संजना जोशी, चैताली बोरेकर, आस्था निबांर्ते, सुषमा रहांगले, आकांशा सोदिया, रिता तरारे, अंजली मडावी, विदिता मेश्राम.
दोन किलोमीटर स्पर्धेतील विजेत्या
उमादेवी चौधरी, अफरीन बानो, डिंपल नायडू, किरण राजकुमार मंडाले, बिपाशा पराग मेश्राम, फेहमिदा बेगम मोहम्मद युसुफ, मुस्कान राधामोहन राय, मेहूल राजू कोठे, विजयंती वामनराव राऊत, श्रुती विजय कंगाले.
महिला बचत गटातील विजेत्या
नुतन चौधरी, पुजा देशपांडे, मामा विजय रोडगे, ललिता गजभे, शहनाज काझी, रजनी, वंदना शंकर बारंडे, मालू शेंडे, मुबाशेरा नियाज.