राज्यातील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना

– ना. सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार राज्य सरकारने केला पूर्ण!

– अर्थमंत्री असताना 2018 च्या अधिवेशनात घेतला होता निर्णय

मुंबई :- महाराष्ट्रातील लाखो ऑटो रिक्षा, मिटर्ड टॅक्सी चालकांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला ; विशेष म्हणजे 9 मार्च 2018 च्या अर्थासंकल्पीय भाषणात ना. सुधीर मुनगंटीवार हे अर्थमंत्री असताना त्यांनीच हा विषय प्रामुख्याने मांडलाहोता आणि ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळावा, कौटुंबिक सुरक्षा लाभावी या दृष्टीने पावले उचलण्याची सूचना केली होती. ना सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराला मिळालेले हे मोठे यश असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आभार मानले आहेत.

महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी यांची नोंदणी बॅज वितरण, निरीक्षण तपासणी व कर भरणा परिवहन खात्याबाबत करण्यात येतो; त्यामुळे ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सीचालकांची अद्ययावत संपूर्ण माहिती परिवहन विभागाकडे उपलब्ध असते. त्यामुळे परिवहन विभागाअंतर्गत ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तसेच सदर मंडळ स्वायत्त व स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी निधीचा स्त्रोत निर्माण करण्यास व शासनाकडून एक वेळचे अनुदान रुपये 50 कोटी तात्काळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत शासनाच्या मंजुरीसाठी मंडण्यात आला होता व त्याला मंजुरी प्रदान करण्यात आली.

ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या कामकाजासाठी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील वर्ग एक संवर्गातील अधिकारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला.

सदर महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे गठन झाल्यानंतर या मंडळामार्फत ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

सदर मंडळाच्या कामकाजाबाचे नियम आणि नियमावली परिवहन आयुक्त यांच्याकडून तयार करण्यात येणार असून महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याण मंडळाचे स्वीय प्रपंजी खाते (पिएलए ) उघडण्यास तसेच सदर मंडळ सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणी करण्यास मान्यता देण्याचे बैठकीत ठरले. राज्यात नोंदणी झालेल्या ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी या वाहनांकडून तीनशे रुपये प्रति वर्ष कल्याणकारी निधी म्हणून जमा करण्यात येणार असून यासाठी 1958 मध्ये सुधारणा करून नव्याने अधिकार वसूल करण्याबाबतची तरतूद समाविष्ट करत या कमी स्थापन केलेल्या खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली.

ना सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2018 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना, राज्यामध्ये ऑटो रिक्षा चालकांची संख्या जवळपास वीस लाखांपर्यंत आहे असा उल्लेख करत त्यांच्या विविध अडचणी मांडण्यासाठी पण निराकरणासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे असा उल्लेख करून महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा मानस असल्याचे सभागृहात सांगितले होते. यासाठी सन 2018-19 मध्ये पाच कोटी रुपये इतका नियत व राखून ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी घोषित केले होते. ऑटो रिक्षा चालक, मीटर टॅक्सी चालक यांच्यासाठी ना सुधीर मुनगंटीवार यांची भावना विद्यमान सरकारने ओळखून मोठा निर्णय आज घोषित केल्यामुळे ना सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'विकसित भारत' निर्मितीसाठी आयआयटी संस्थांची भूमिका महत्वाची : राज्यपाल रमेश बैस

Sun Mar 17 , 2024
– आयआयटी संस्थांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांप्रती अधिक संवेदनशील व्हावे मुंबई :- स्वातंत्र्योत्तर काळात आयआयटी संस्थांचे देशविकासात मोठे योगदान राहिले आहे. देशातील उच्च शिक्षण संस्था व विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये काही आयआयटी संस्था नेहमी उच्च स्थानावर असतात. ‘विकसित भारता’चे लक्ष्य गाठताना सर्व आयआयटी संस्थांनी प्रशासन अत्याधुनिक व विद्यार्थी – स्नेही करावे, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अधिक संवेदनशील व्हावे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com