– व्हिडीओ शुटींगद्वारे होणार तपासणी
चंद्रपूर :- पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवर अनेकदा दुकानदार हे आपले दुकानाचे साहित्य ठेऊन रहदारीस अडथळा निर्माण करतात त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे अश्या दुकानांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असुन साहित्य जप्तीची कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे.
फेरीवाले फुटपाथवर साहित्य विक्रीस बसतात,जो फुटपाथ शिल्लक राहतो त्यावर दुकानदार त्यांच्या दुकानातील साहित्य व बोर्ड मांडून ठेवतात. रस्त्यावरील दुकानांसमोर त्यांचे साहित्य व वाहनांचे पार्किंग यामुळे पादचाऱ्यांना जागा मिळेल तेथून रस्ता शोधावा लागतो. दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्याने नागरिकांना बाजारपेठेत पार्किंगसाठी जागा शोधण्याची कसरत करावी लागते.
यावर मार्ग काढण्यासाठी मनपातर्फे ४ अतिक्रमण निर्मूलन पथक गठीत करण्यात आले असुन या पथकांद्वारे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जात आहे. सदर पथकांना पथक निहाय गाडी देण्यात आली असुन बाजारात फिरतांना प्रत्येक दुकानाचे व्हिडीओ चित्रीकरण त्यांच्याद्वारे केले जाणार आहे. साहित्य बाहेर असलेल्या दुकानांवर साहित्य जप्तीची कारवाई करून दंड व पुन्हा सदर प्रकार घडल्यास दुकान सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर बांधकाम साहीत्य टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात असुन जोपर्यंत बांधकाम साहित्य रस्त्यावर असेल तोपर्यंत त्यांच्यावर दंड ठोठावला जाणार आहे.