पाच मतदार संघ, पाच निरीक्षणे आणि एक अंदाज

पूर्व विदर्भातील पाच मतदार संघांत म्हणजे नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली. काल पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले आणि मतदानानंतर कोणत्या पक्षाची जागा निवडून येईल याबद्दल काही एक आडाखे ताबडतोब बांधायला सुरुवात झालेली आहे.

त्यासंबंधीची काही निरीक्षणे व शेवटी एक अंदाज.

या निरीक्षणांसाठी आणि अंदाज बांधण्यासाठी काल मतदानानंतर एक छोटे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर केला. त्याची पद्धत अशी. प्रत्येक मतदार संघातील दोन भाजप नेते व दोन कॉंग्रेस नेते यांच्याशी बोललो. त्याचप्रमाणे आता पूर्वीसारखे निष्पक्ष पत्रकार नसल्याने दोन भाजप समर्थक आणि दोन भाजप विरोधक मानल्या जाणाऱ्या पत्रकारांशी बोललो. त्याचप्रमाणे कोणत्याही राजकीय पक्षाचे थेट कार्यकर्ते नसलेले, स्वतःची स्वतंत्र राजकीय मते असलेले परंतु तरीही राजकारणात रस असणारे अनेक सामान्य लोक असतात. त्यापैकी मतदार संघात दोन ते तीन अशा सामान्य पण राजकीयदृष्ट्या प्रगल्भ लोकांशीही बोललो. त्यातून ही निरीक्षणे आणि अंदाज बांधायला मदत झाली. शिवाय दहा वर्षांपूर्वी पत्रकारितेतली नोकरी सोडली असली तरी अजूनही महाराष्ट्रभर बऱ्यापैकी ओळखीपाळखी जिवंत आहेत. त्यांचीही या निरीक्षणांसाठी मदत झाली.

ही निरीक्षणे आणि अंदाज काही अचूकच असतील असा दावा नाही, परंतु ती बऱ्यापैकी वास्तवाला धरून असावी असे वाटते. म्हणून सहज सगळ्यांशी शेअर करत आहे.

१. थेट लढत

या पाचही मतदार संघांत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झालेली दिसत आहे. एकही मतदार संघात वंचित बहुजन आघाडी किंवा इतर कोणत्याही पक्षाचा अपक्ष उमेदवार प्रभावी ठरला नाही, असे बहुतेक राजकीय नेत्यांचे आणि पत्रकारांचे प्राथमिक निरीक्षण आहे.

२. मुस्लीम व दलित मते

या पाचही मतदार संघांत मुस्लीम आणि दलित मतांमध्ये विभाजन झाल्याचे दिसत नाही. या पाचही मतदार संघांत वंचित बहुजन आघाडीचा कोणताही उमेदवार प्रभावी न ठरल्याने दलित मतांमध्ये फारसे विभाजन झालेले नाही, असे दिसते. त्यातही मुस्लीम मतदारांमध्ये मतदानाप्रती कमालीचा उत्साह दिसून आल्याचे सगळ्यांनीच सांगितले. नागपुरातील मोमिनपुरा, ताजबाग, इत्यादी मुस्लिमबहुल भागांमध्ये सकाळी सकाळीच मोठमोठ्या रांगा दिसून आल्या. यामुळे कॉंग्रेस नेत्यांना बरे वाटले तर भाजप नेत्यांना जरा काळजी वाटल्याचे चित्र दिसून आले. परंतु हे चित्र दिसताक्षणी भाजपच्या निवडणूक यंत्रणेने आपले मतदार घराबाहेर काढण्यासाठी विशेष काळजी घेतल्याचे सगळ्यांनीच आवर्जून सांगितले. त्यामुळे मुस्लीम आणि दलित मतदानात झालेली वाढ हाताबाहेर जाऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून आले.

३. तीन मतदार संघांत स्पष्ट बढत

दोन्ही बाजूंच्या लोकांशी आणि सामान्य लोकांशीही बोलताना तीन मतदार संघांबाद्द्ल एक सर्वमान्यता दिसून आली. हे तीन मतदार संघ म्हणजे अ. गडचिरोली ब. भंडारा-गोंदिया आणि क. नागपूर. गडचिरोली मतदार संघाबद्दल बोलताना अगदी भाजपचे लोकही हे सांगत होते, की या मतदार संघात त्यांना अपेक्षित नसलेला प्रतीसाद कॉंग्रेसच्या उमेदवाराला मिळालेला दिसला व मोठ्याप्रमाणात कॉंग्रेसच्या बाजूने मतदान झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे अगदी प्राथमिक स्वरूपाचे जे अंदाज व्यक्त केले जातात, त्या अंदाजानुसार ती जागा कॉंग्रेसच्या पारड्यात जाईल असे सगळ्यांचेच मत पडले. त्याचप्रमाणे भंडारा-गोंदिया मतदार संघातील लढत जवळजवळ एकतर्फीच झाली असून ती भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने गेली असावे असे अगदी कॉंग्रेसवाल्यांचेही निरीक्षण दिसले. त्यामुळे बहुतेकांच्या मते ही जागा भाजप उमेदवाराच्या बाजूने निकाल देईल असे वाटते. शेवटी नागपूर या मतदार संघाबद्दल कॉंग्रेस आणि भाजपच्या गोटांत म्हणजे नेते आणि पत्रकारांच्या मतांत कमालीचे अंतर जाणवले. भाजप नेत्यांच्या मते गडकरी ही जागा मोठ्या फरकाने जिंकतील प्रश्न आहे तो म्हणजे मोठा फरक म्हणजे किती मोठा फरक एवढाच. परंतु कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मते यावेळी विकास ठाकरे हे giant killer ठरू शकतात. त्यांची कारणे म्हणजे यावेळी नागपुरातील सर्व कॉंग्रेसचे नेते एकदिलाने गडकरींच्या विरोधात प्रचारात उतरले होते. जे सामान्यतः यापूर्वी गटातटांत विभागलेल्या विदर्भ कॉंग्रेसमध्ये घडत नसे. दुसरे कारण जे देतात ते म्हणजे एक गठ्ठा झालेल्या दलित आणि मुस्लीम मतांत. व तिसरे कारण म्हणजे नागपुरातील कुणबी मतदारांत यावेळी न पडलेली फुट. बहुतेक सगळे तीनही कुणबी मतदान हे कॉंग्रेसच्या बाजूने गेल्याचे त्यांचा दावा आहे. परंतु सामान्य लोकांमध्ये मात्र गडकरी ही निवडणूक सहज जिंकतील असेच चित्र आहे.

४. चंद्रपूरचे विशेष

चंद्रपूर मतदार संघात भाजपच्या नेत्यांना व पत्रकारांना मुनगंटीवार यांना ही लढत थोडी कठीण गेली असली तरी ते शेवटी विजय खेचून नेतील असे त्यांचे मत दिसले. परंतु त्यांना ही निवडणूक कठीण गेली असे दबक्या आवाजात का होईना पण अगदी भाजप समर्थक प्रत्रकारांनीही सांगितले. कॉंग्रेसच्या नेत्यांच्या व कॉंग्रेससमर्थक पत्रकारांच्या मते अनिच्छेने निवडणुकीत उतरलेल्या मुनगंटीवारांच्या नियंत्रणात ही निवडणूक अगदी सुरुवातीपासूनच आलीच नाही आणि कॉंग्रेस पक्षाच्या यंत्रणेसोबतच कॉंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या दिवंगत खासदार पतीने निर्माण केलेले स्वतःचे एक नेटवर्क आहे व ते प्रतिभा धानोरकरांच्या कामी आलेले दिसते. शिवाय मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ या मतदार संघातील ज्यांचे तिकीट कापण्यात आले ते माजी खासदार हंसराज अहिर आणि भाजपच्या राजकारणातून हद्दपार करण्यात आलेले शोभाताई फडणवीस या दोघांनीही काहीही प्रयत्न न केल्याचे अगदी सगळ्यांनी सांगितले. तुलनेत कॉंग्रेसचे सर्व नेते कमी जास्त प्रमाणात प्रचारात सक्रीय होते, हेही सगळ्यांनी आवर्जून सांगितले. सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर, बल्लारशाह आणि वरोरा या भागात बऱ्यापैकी समर्थन मिळाल्याचे चित्र आहे, परंतु राजुरा, आर्णी, वणी इत्यादी भागांत मुनगंटीवार यांचा जनसंपर्क आणि पकड दोन्ही खूपच कमी पडल्याचे चित्र सगळ्यांनी मान्य केले. मुनगंटीवार यांनी काही विवादास्पद विधाने करून मतदार संघात त्यांच्या विरोधात जाईल असे काही प्रमाणात वातावरण निर्माण व्हायला स्वतःच मदत केली, परंतु प्रतिभा धानोरकर यांनी मात्र त्यांच्या कोणत्याही विधानांत कोणताही वादविवाद होणार नाही याची काळजी घेतलेली दिसते, असे सगळ्यांचे मत पडले. शेवटी प्रचार सगळ्याच सभांमध्ये नाही तर किमान काही प्रचार सभांमध्ये डोळ्यांत हुकुमी अश्रू आणण्याचे त्यांचे जे कसब आहे त्याची सगळ्यांनी नोंद घेतल्याचे दिसले. एका भाजप नेत्याने तर अत्यंत मिश्कील टिप्पणी केली. तो म्हणाला, ‘सभेत हुकुमी रडण्याच्या बाबतीत प्रतिभा धानोरकर मोदींपेक्षाही दोन मार्क जास्त कमावले असे म्हणायला हरकत नाही!’

५. रामटेकची चुरस

रामटेक या मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी त्यांचे प्रस्तापित उमेदवार न देता नवे उमेदवार दिले, त्यामुळे दोन्ही आघाड्यांत प्रस्तापित गटांमध्ये नाराजीचे चित्र समान होते. त्यात महायुतीच्या वतीने शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या नेत्यांनी या मतदार संघाकडे फारसे लक्ष न दिल्याचे अनेकांनी सांगितले. तुलनेत कॉंग्रेसच्या सुनील केदार यांनी ही निवडणूक कॉंग्रेस उमेदवाराच्या वतीने स्वतःच्या प्रतिष्ठेची केल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला इथे बऱ्यापैकी चांगले समर्थन मिळाल्याचा दावा कॉंग्रेसचे लोक करताना दिसले. तरीही दोन्ही बाजूचे लोक हा मतदार संघ आपण खात्रीने जिंकतो आहे, असे खातरीने म्हणताना दिसले नाही. बहूतेक सगळ्यांचे मते रामटेक येथे अगदीच काट्याची टक्कर होऊन विजयी उमेदवाराला निसटता विजय मिळेल, असे एक सर्वमान्य निरीक्षण दिसले.

शेवटी अंदाज

1. गडचिरोली कॉंग्रेसच्या खात्यात तर भंडारा-गोंदिया भाजपच्या खात्यात जाईल याबद्दल मतैक्य दिसले.

2. नागपूरची जागा नीतीन गडकरी सहज जिंकतील असे कॉंग्रेसचे नेते व पत्रकार वगळता सगळ्यांचे मत दिसले.

3. चंद्रपूरची जागा सुधीर मुनगंटीवार थोड्या फरकाने का होईना पण जिंकतील, असे फक्त भाजपच्या नेत्यांचेच मत दिसले. इतर सगळ्यांच्या मते प्रतिभा धानोरकर यांना या मतदार संघात चांगल्या फरकाने विजय मिळेल.

4. रामटेक लोकसभा मतदार संघाबद्दल कोणताही ठोस अंदाज बांधता येत नसला तरी इथे कमालीची चुरस बघायला मिळणार आणि जिंकणाऱ्या उमेदवाराची विजयाची बढत ही अगदीच बारकी राहील, असे सगळ्यांचेच मत पडले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सनातन संस्था के रजत महोत्सव के अवसर पर 'सनातन गौरव दिंडी' का आयोजन !

Sat Apr 20 , 2024
– 50 से अधिक धार्मिक संगठनों एवं सम्प्रदाय सहभागी होगें ! पुणे :- सनातन संस्था की स्थापना के 25 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में संस्था द्वारा रजत महोत्सव का आयोजन किया गया है । इस रजत महोत्सव के अवसर पर सनातन संस्था द्वारा पुणे में 21 अप्रैल को शाम 5 बजे महाराणा प्रताप उद्यान से स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक डेक्कन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com