-विविध मागण्यांसाठी सीआरएमएस सरसावली
नागपूर :- जुनी पेंशन सुरू करावी, या मुख्य मागणीसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने (सीआरएमएस) मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालय परिसरात आंदोलन केले. तसेच मुख्य कार्यालयाला निवेदन सादर केले. तत्पूर्वी संघटनेतर्फे रॅली काढण्यात आली.
सीआरएमएसने एक ते 8 मे पर्यंत कामगार सप्ताहा दरम्यान कर्मचारी जनजागरण सप्ताह पाळला. या दरम्यान कर्मचार्यांना सतत भेडसावणार्या समस्या त्यांच्या कडून जाणून घेतल्या तसेच त्यांना जागृत केले. सोमवारी या सप्ताहाचा समारोप झाला. त्या प्रसंगी संघटनेचे विभागीय अध्यक्ष विरेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
यावेळी सिंग, जी.एम. शर्मा, राकेश कुमार, भारत ताकसांडे, संग्राम सिंग, सोफीया सिराज यांनी रेल्वेत होणार्या खाजगीकरणाचा कडाडून विरोध दर्शविला. नवीन योजनेमुळे निवृत्ती नंतर जगणे कठीण होणार आहे. जगण्यासाठी जी काही तरतूद असते तीच हिरावून घेण्यात आली. त्यामुळे म्हातारपणाचा आधार गेला आहे. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. दर महिण्यात मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त होतात. मात्र, त्यांच्या जागी भरती केली जात नाही. त्यामुळे कामाचा ताण वाढत असून कर्मचार्यांना आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत.
नवीन पेेंशन योजना बंद करून जुनी पेंशन सुरू करावी, रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावे, पदे रद्द करणे बंद करावे त्याच प्रमाणे ग्रेट-1 आणि ग्रेट-2 या दोन्ही तांत्रिक पदांना एकत्रित करण्यासाठी रेल्वेने मंजुरी दिली. हा कर्मचार्यांवर अन्याय आहे. दोन्ही पदे एकत्रित करू नका अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यासोबतच रनिंग कर्मचार्यांना त्रास कमी करण्यात यावा, आदी मागण्याी करण्यात आल्या. आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.