– वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी गोळ्या घेत केली जनजागृती
– ३१ ऑगस्ट पर्यंत चालणार अभियान
नागपूर :- व्यक्ती कुठल्याही आजारापासून बरा होऊ शकतो, असा विश्वास नेहमी व्यक्त करणारे डॉक्टर रुग्णाचे मनोबल वाढविण्यासह त्यांच्या आजारावर उपचार करून त्याला बरं करण्यात जितके पुढे आहेत, तितकेच ते आजारांविषयी जनजागृतीही पुढाकार घेतात हे नागपूर महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी दाखवून दिले. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान शहरात हत्तीरोग दुरीकरण मोहीम राबविण्यात येत असून, यादरम्यान घरोघरी वितरित करण्यात येणाऱ्या गोळ्यांविषयी नागरिकांच्या मनात कुठलाही संभ्रम राहू नये, याकरिता मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी स्वतः गोळ्या घेत मोहिमेचा शुभारंभ केला. सर्व झोन मध्ये ही मोहिम सुरु करण्यात आली आहे.
मनपाच्या नेहरूनगर झोन कार्यालय येथून हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ गुरुवार (ता.१७) रोजी करण्यात आला. याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती, डॉ. विजय तिवारी, माजी नगरसेविका दिव्या धुरडे, स्नेहल बिहारे यांच्यासह झोनल वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी स्वतः गोळ्या घेत मोहिमेविषयी जनजागृती केली.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या देखरेखीत हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान शहरात हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
हत्तीरोग संदर्भात जनजागृती करण्याकरिता मनपाच्या लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, धंतोली झोन, नेहरूनगर झोन या झोनमध्ये जवळपास ६२४ जनजागृती बूथ उभारण्यात आले आहेत. तसेच ५६७ चमूच्या माध्यमातून घरोघरी गोळ्या वितरित करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करीत मोहिम यशस्वी करावी असे आवाहन हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे करण्यात आले आहे.