Ø मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
Ø आतापर्यंत 266 कोटींची वीज बिल माफी
यवतमाळ :- गेल्या काही वर्षातील हवामान बदल, दुष्काळ आणि सातत्याच्या नापिकीने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने त्यांच्या कृषी पंपाला मोफत वीज पुरवठा करून त्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु केली. जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत डिसेंबर अखेरपर्यंत 266 कोटींची वीज बिल माफी देण्यात आली आहे.
भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत आहे. त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या शेती पंप ग्राहक शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु करण्यात आली. योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान केली होती.
जिल्ह्यात 1 लाख 30 हजार शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत. त्यात वीज वितरणच्या दारव्हा विभागात 38 हजार 412 शेतकरी, पांढरकवडा विभागात 27 हजार 597 शेतकरी, पुसद विभाग 41 हजार 872 शेतकरी तर यवतमाळ विभागात 22 हजार 994 शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना योजना सुरु झाल्यापासून डिसेंबर अखेरपर्यंत 266 कोटीची वीज बिल माफी देण्यात आली आहे. राज्यात योजनेचा 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
मोफत वीज योजना पाच वर्षासाठी म्हणजे मार्च 2029 पर्यंत राबविण्यात येणार आहे. 7.5 एचपी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंपधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. या शेतकऱ्यांना पुर्णपणे मोफत वीज पुरविण्यात येत आहे. वीजदर सवलतीची रक्कम प्रतिवर्षी 14 हजार 760 कोटी शासनाकडून अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.
राज्यात 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. एकूण ग्राहकांपैकी 16 टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30 टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39 हजार 246 दशलक्ष युनीट आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो.
गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट झाली आहे. आर्थिक अडचणींमुळे शेतकरी कृषी पंपाचे वीज बिल भरू शकत नाही. बिल थकल्याने अनेकदा वीज पुरवठा खंडीत केला जायचा. त्यामुळे आमच्या ओलिताची अडचण व्हायची, पिकांचे नुकसान व्हायचे. मोफत वीज योजनेमुळे बिल थकीत होऊन वीज खंडीत होण्याची भिती राहिली नाही. शिवाय वीज बिलावर होणार खर्च वाचला.
– प्रविण ठाकरे, शेतकरी, चिकणी ता.दारव्हा