सीमावर्ती गावातील वयोवृद्धांनी बजावला मतदानाचा हक्क

– अतिदुर्गम भागात गृह मतदानाच्या सुविधेने मोठा दिलासा

– निवडणूक यंत्रणा पोहोचली अतिदुर्गम भागात

नागपूर :- कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. रामटेक, काटोल या उपविभागातील अतिदुर्गम भागात असलेल्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात आपलेही योगदान दिले.

सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनात १४ ते १७ एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याची सुरुवात १४ एप्रिल रोजी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली. त्यांनतर जिल्ह्यात विविध ठिकाणी गृह मतदान सुरू आहे.

रामटेक तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगतच्या अति दुर्गम आदिवासी भागात वयोवृद्धांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. करवाही, दुलारा, बेलदा या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या गृह मतदानाचा आनंद चेह-यावर पहायला मिळाला. यात दुलारा येथील जानोती उईके, शेवंताबाई मराठे करवाही येथील मंगोलाबाई उईके आणि बेलदा येथील नारायणराव भाल, गंगुबाई भाल, लक्ष्मण गराट यांनी गृह मतदान केले.

रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ तसेच दिव्यांग अशा एकूण 118 पैकी 112 मतदारांनी मतदान केले. यासाठी 13 पथके तयार करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी मतदानस्थळी भेट देऊन पाहणी करीत मतदानाची गोपनीयता पाळण्याच्या सूचना केल्या. काटोल उपविभागातील प्रामुख्याने सोनोली, राजनी, खामली, खारगड, हिवरमठ, येनिकोनी, अंबोला, खैरगाव,गोधनी, गायमुख या गावातील वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. काटोलचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिवराज पडोळे यांनीही अनेक मतदारस्थळी भेट देत पाहणी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील 87 हून अधिक उमेदवार यशस्वी

Wed Apr 17 , 2024
नवी दिल्‍ली :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम आले असून देशात त्यांनी 42 वा क्रमांक पटकाविला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2023 च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com