कमी मतदान टक्केवारीच्या मतदान केंद्रांपर्यंत पोहोचून स्वीपद्वारे मतदान वाढीसाठी प्रयत्न करावेत- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

पुणे :- कमी मतदान असलेला जिल्हा किंवा मतदार संघस्तरावर स्वीप कार्यक्रम मर्यादित न ठेवता कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचून तेथील मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, असे निर्देश प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

यशदा येथे आयोजित स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयोगाच्या वरीष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा आदी उपस्थित होते.

चोक्कलिंगम म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या भूमिका सुरुवातीच्या काळातील नियंत्रक, अंमलबजावणी करणारी संस्था ते आता मतदान जनजागृतीपर्यंत विस्तारल्या आहेत. निवडणूक आयोग जनजागृतीसाठी आता मतदान कमी असलेल्या राज्यापर्यंतच नव्हे तर कमी असलेल्या शहरांपर्यंत पोहोचला आहे. आता सर्वांना मिळून कमी मतदान केंद्रापर्यंत पोहोचून तेथे ९० टक्क्याहून अधिक मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

ते पुढे म्हणाले, संविधाननिर्मितीनंतर मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळाला. युरोपातील काही देशांच्या आधीच संविधानाने आपल्याला मताचा अधिकार दिला. या पार्श्वभूमीवर सुशिक्षित नागरिकांच्या मतदानाप्रती उदासीनतेमुळे शहरात कमी मतदान होत आहे. शहरी भागातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विविध प्रयत्न होत असून राज्यात मुंबई, पुणे, ठाणे या शहरात गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये १५१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

अजमेरा म्हणाले, सुरूवातीला केवळ मतदान जागृतीचे उपक्रम साजरे करण्यापर्यंत मर्यादित असलेला स्वीप उपक्रम मतदानविषयक माहितीचे विश्लेषणानुसार करावयाच्या उपाययोजनांपर्यंत पोहोचला आहे. आता मतदानाची टक्केवारी, मतदारांचा सहभाग कमी पडू नये याला महत्त्व आले आहे. यासाठी त्यातील कमतरता शोधून त्याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. पुणे जिल्ह्याने स्वीप उपक्रमात खूप चांगले काम केल्याचेही अजमेरा यावेळी म्हणाले.

शहरी नागरिकांच्या वर्तनशास्त्राचा अभ्यास केला असता त्यांच्यात मतदानासाठी प्रवास करण्याची मानसिकता नसणे, मतदानाच्या दिवसाला सुट्टीचा दिवस मानणे असे विश्लेषणात समोर आल्यामुळे ही मानसिकता बदलण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

देशात राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी मतदान असलेल्या ८ राज्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातही ३ लोकसभा मतदार संघ ५० टक्क्याहून कमी मतदानाचे, १३ मतदारसंघ ५० ते ६० टक्के, २२ मतदार संघ ६० ते ६५ टक्के मतदान, तर ६५ टक्क्यावर मतदान असलेले १० मतदार संघ आहेत. मुंबई, पुणे, ठाणे शहरात राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी मतदान होते. मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांवर भर देणे आवश्यक असून चांगले काम केलेल्या जिल्ह्यांचा आयोगाकडून सन्मान केला जातो, असेही अजमेरा यांनी सांगितले.

आयोगाने शैक्षणिक संस्था, पेट्रोलिअम असोसिएशन, डाक कार्यालये, बँक असोसिएशन, नागरी विमान संचालनालय, रेल्वे आदींबरोबर स्वीपसाठी सामंजस्य करार केले असून जिल्ह्यांनीही मतदार जागृतीचे उपक्रम राबवावेत, असे अजमेरा म्हणाले.

यावेळी जिल्ह्यांच्या स्वीप समन्वय अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात स्वीप अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत सादरीकरण केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामटेक लोकसभा निवडणुकीत कामठी शहर तसेच लगतच्या गावाची धुरा भाजप पदाधिकारी अजय अग्रवाल सांभाळणार- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे..

Tue Mar 26 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 26:-येत्या 19 एप्रिल ला रामटेक लोकसभा मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे.या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार राजू पारवे रिंगनात असून यांना विक्रमी मताने निवडुन आणण्यासाठी भाजप महायुतीचा धर्म निष्ठेने पार पाडत जीवाचे रान करून कुठलीही तमा न बाळगता विजय हाच एक संकल्प घेतला आहे.यासाठी रामटेक लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या कामठी शहर तसेच लगतच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com