नागपूर :- शासनाने इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्यांतर्गत, देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लक्ष रुपये व परदेशात शिक्षणासाठी 20 लक्ष रुपये मर्यादेत कर्जावर व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळार्माफत सुरु केली आहे. या योजनेत बँकेकडील भरलेल्या व्याजाच्या 12 टक्के पर्यंत परतावा मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
योजनेच्या अटी व लागणारी कागदपत्रे याप्रमाणे आहे. उमेदावाराचे वय 17 ते 30 वर्ष असावे. महाराष्ट्राचा रहिवासी असावा, इमाव असल्याचा जातीचा दाखला, तहसीलदार यांचा कौटुंबीक वार्षिक उत्पन्न 8 लक्ष पर्यंतचा दाखला किंवा नॉन क्रिमीलेअरच्या मर्यादेत, बारावीमध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा, उमेदवार व त्याचे पालक यांचे आधार कार्ड, छायाचित्र, आधार लिंक बचत खाते पासबुक, वयाचा पुरावा, शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागदपत्र आदी कागदपत्रे जोडावेत. योजना ऑनलाईन असून महामंडळाच्या www.msobcfdc.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत.
राज्य व देशांतर्गत तसेच परदेशी अभ्यासामध्ये येणारे उपक्रम
आरोग्य विज्ञान व अभियांत्रिकी शाखेच्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषी, अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान, दुग्धविज्ञान शाखेमधील सर्व संबंधित अभ्यासक्रम आदी.
व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी
शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत बँकेने उमेदवाराला वितरीत केलेल्या कर्ज रक्कमेवरील व्याजाची नियमित परतफेड केलेल्या उमेदवाराला केवळ व्याजाचा परतावा महामंडळ उमेदवारांच्या आधार लिंक बँक खात्यात वर्ग करेल. परतफेडीचा कालावधी जास्तीत जास्त पाच वर्ष असणार आहे.
ज्या पात्र उमेदवारांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी महामंडळाच्या संकेतस्थळावर जावून अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रहाटे कॉलनी, नागपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 0712-2956086, मो. क्र. 9423677744 यावर संपर्क साधावा.