मानेवाडा लायब्ररीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते लोकार्पण
नागपूर :- मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये या ठिकाणी ई – लायब्ररी उघडण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. आज त्याचे प्रत्यक्ष रूप बघताना आनंद होत असूनही ही लायब्ररी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानेवाडा येथील लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केली.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत दक्षिण नागपुरात ई – लायब्ररीच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, सुधाकर कोहळे ,जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी व नगरसेवक उपस्थित होते.
आमदार मोहन मते यांनी या लायब्ररीसाठी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण असून नागपूर विदर्भातील या पद्धतीची ही पहिली ई -लायब्ररी आहे. याचा निश्चितच तरुणाईला फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी शहरातील मोकळ्या जागांचा योग्य उपयोग होण्यासाठी वॉकिंग ट्रॅक, ओपन जीम,खेळांची मैदाने, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधा आणि गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, अभ्यासिका उघडण्याचे प्रस्ताव ठेवले होते. आज या ठिकाणी अशी एक सुंदर व्यवस्था निर्माण झाली असून या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्य घडवण्यासाठी मानेवाडा ई -लायब्ररी केंद्र ठरत आहे. याचा आनंद आहे. गरज असल्यास विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची देखील व्यवस्था केली जाईल ,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी ई – लायब्ररीचे लोकार्पण जाहीर केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी अप्रतिम सुविधा निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक आहे.ज्ञान ही ऊर्जा असून ई- लायब्ररीच्या माध्यमातून ज्ञानाचे भांडार मानेवाडा परिसरात खुले झाले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला असून नागपूर सुधार प्रन्यास व आमदार मोहन मते यांचा पुढाकार कौतुकास्पद आहे.