‘महाज्योती’ च्या माध्यमातून ओबोसी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणार  – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई :-  विविध अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थी आणि उमेदवार यांच्यासाठी ‘महाज्योती’ ने आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेतला असून, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

‘महाज्योती’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री अतुल सावे बोलत होते. या बैठकीला महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे, संचालक डॉ. सिद्धार्थ गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल वासनिक, कंपनी सेक्रेटरी अविनाश गंधेवार उपस्थित होते.

पीएच डी. करणाऱ्या उमेदवारांना अवॉर्ड दिनांकापासून पहिल्या दोन वर्षांसाठी रु.३१ हजार, तसेच घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च तर पुढील तीन वर्षांसाठी रु.३५ हजार तसेच घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च देण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. एम. फिल. उमेदवारांना एम. फिल ते पीएच.डी. असे एकत्रित (Integrated) देण्याबाबत बार्टी, पुणेच्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या शिफारशीनुसार कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एम. फिल. उमेदवारांना रु.३१ हजार, घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च देण्याचा निर्णयही घेण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेसाठी दिल्ली येथे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना मासिक विद्यावेतन रु.१३ हजार आणि रुपये १८ हजार आकस्मिक एकवेळ खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांना रु.२५ हजार एकवेळ अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या २० उमेदवारांना रु.१० हजार प्रतिमाह विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com