-विविध समाज घटकांकडून कुलगुरूंचे स्वागत
नागपूर :-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा डॉ. सुभाष चौधरी यांनी पूर्ववत कार्यभार गुरुवार, दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता सांभाळला. कुलगुरू पदाचा कार्यभार पूर्ववत स्वीकारल्यानंतर संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयीन व्यवस्थापनाचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, यांच्यासह विविध सामाजिक संघटना तसेच समाज घटकांकडून डॉ. सुभाष चौधरी यांचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले.
कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात स्वागत समारंभ आणि शुभेच्छा पर्व पार पडले. यावेळी मनोगत व्यक्त करताना माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासाबाबत माहिती दिली. शैक्षणिक क्षेत्रात विविध पदावर कार्य केले असल्यामुळे महाविद्यालयीन स्तरावर विकासासाठी कोणत्या अडचणी येतात याची जाणीव होती. त्याचा फायदा विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयीन तसेच स्वायत्त विभागांच्या विकासात योग्य रितीने होत आहे. कुलगुरू झाल्यानंतर महाविद्यालये तसेच विभागांचा योग्य विकास करण्याकरिता धोरण तयार केले. संपूर्ण महाराष्ट्रात अभियांत्रिकी शाखेला सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरण लागू केले. सोबतच अनेक बाबी प्रथमच करण्यात आल्या.
समाजाचा सामाजिक-आर्थिक विकास कसा होईल, या दृष्टीने कार्यक्रम निश्चित करण्यात आले. विविध पायाभूत सुविधा उभारण्याचे कार्य सुरू केले. विद्यापीठात मोठ्या प्रमाणात संशोधन होते. त्याचा समाजाकरिता अधिक प्रमाणात उपयोग व्हावा म्हणून विविध उपाय योजना करण्यात आल्या. स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा वापर करून विकासाच्या दृष्टीने ‘रिचिंग टू अनरीच्ड’ अभियानाची सुरुवात करण्यात आली, असे डॉ. चौधरी यांनी स्वागत समारंभाला उत्तर देताना सांगितले. सर्वांच्या सहकार्याने हे साध्य करता आले आणि पुढेही सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे डॉ. चौधरी म्हणाले. उपस्थितांपैकी विविध क्षेत्रातील अनेक गणमान्य व्यक्तींनी कुलगुरू आणि त्यांचा कार्यावर मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, आयआयएल संचालक डॉ. राजेश सिंह, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. मंगेश पाठक, ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ, शताब्दी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष कसबेकर, डॉ. अनंत पांडे, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक, माजी विभागप्रमुख डॉ. गोवर्धन खेडकर, कर्मयोगी फाउंडेशनचे पंकज ठाकरे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध विभागांचे उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव, अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठ विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी यांच्यासह ५०० पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती होती.