– कृषी क्षेत्रावर दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या प्रयोगांची गरज
नागपूर :- ‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या नावाने विदर्भातील शिक्षण क्षेत्राला जशी दिशा मिळाली तशीच कृषी क्षेत्रालाही मिळणे आवश्यक आहे. भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांनी जे व्हिजन लोकांपुढे ठेवले ते आज आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांच्या नावाने कृषी क्षेत्रावर दीर्घकालीन चांगले परिणाम करणारे प्रयोग केल्यास तीच खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ना. नितीन गडकरी यांनी विचार मांडले. विद्यापीठाच्या गुरुनानक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी अध्यक्षस्थानी होते. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण चौधरी, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणाची गुणवत्ता वाढावी आणि त्याचवेळी शिक्षण सर्वस्पर्शी व्हावे, यासाठी अभूतपूर्व कार्य केले. शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्य बघून आज त्याची प्रचिती येते. त्याचवेळी त्यांनी देशाच्या कृषी विकासाला व्हिजन देण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या १२५ व्या जयंतीला स्मरणिका प्रकाशित करणे, व्याख्याने आयोजित करणे आवश्यक आहेच. पण या कार्यक्रमांनंतरही डॉ. पंजाबराव देशमुखांची आठवण राहावी याकरिता ग्रामीण भागासाठी, कृषी क्षेत्रासाठी त्यांनी जे विकासाचे व्हिजन ठेवले होते त्यावर प्रत्यक्ष काम करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांचे कार्य विदर्भाशी संबंधित राहिले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनावर दीर्घकालीन चांगले परिणाम व्हावे यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.’ अमरावती मार्गावरील दाभा येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे एग्रो कन्व्हेन्शन सेंटर उभारले जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ना. गडकरी पुढे म्हणाले, ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ लोकाभिमूख होणे गरजेचे आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल या दृष्टीने उपक्रम राबविले पाहिजे. जोपर्यंत येथील शेतीच्या परिस्थितीत बदल होत नाही आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, तोपर्यंत उपयोग होणार नाही.’ शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारी विद्यापीठांचे योगदान आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. शेतीविषयक अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्रामीण भागाचे चित्र बदलता येऊ शकते, असे ना. गडकरी म्हणाले.