महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
• अश्या चुकीच्या माहिती संबंधी नागरिकांनी सतर्क रहावे, नागपूर मेट्रोचे आवाहन
नागपूर :- महा मेट्रोत नोकरी लावून देतो असे सांगत पैसे घेण्याचे प्रकार घडत आहेत. एकीकडे असे प्रकार होत असतानाच आता QR कोड स्कॅन करत किंवा लिंक च्या माध्यमाने पैसे भरल्यास महा मेट्रोत नोकरी मिळते असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अश्या कुठल्याही पद्धतीने नागपूर मेट्रोत नोकरी मिळत नसून या बद्दल नोकरी करता प्रयत्न करणाऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन नागपूर मेट्रो करीत आहे.
नोकरीच्या नावावर फसवणुकीचे प्रकार नागपुरात होत असल्याचे चित्र आहे. आजवर या संबंधाने शहराच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंद देखील झाली आहे. असे प्रकार होत असतानाच आता फसवणुकीच्या या नवीन प्रकारापासून सर्वांनी सावध असावे असे आवाहन करण्यात येत आहे. काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमाने मोबाईलवर लिंक पाठवून सुरक्षा रक्षक पदावर नोकरी देण्याकरता व्हेरिफिकेशन साठी १ हजार रुपये व गणवेशाकरिता ५५०० रुपये भरण्याकरिता व्हॉट्स ऍप द्वारे चुकीचे प्रलोभन दिल्या जात असल्याची नोंद सर्वांनी घ्यावी.
महा मेट्रो तर्फे या संबंधाने सातत्याने पाठ पुरावा करत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतात. या संबंधाने मेट्रो तर्फे बातम्या देखील दिल्या आहेत. मेट्रो तर्फे पदभरती होत असतांना त्या संबंधीची सर्व माहिती महा मेट्रोची वेबसाईट www.mahametro.org व प्रतिष्ठित वर्तमान पत्रांमध्ये प्रकाशित केल्या जाते. त्यामुळे पदभरती संबंधी कुठलीही माहिती मिळाल्यास याची संपूर्ण शहानिशा महा मेट्रोची ऑफीशीयल वेबसाईट (संकेत स्थळ) किंवा मेट्रो भवन कार्यालयातून करावी तसेच टोल फ्री क्रमांक : १८००२७००५५७ वर संपर्क साधावा. असे आव्हान महा मेट्रो,नागपूर तर्फे नागरिकांना केले जात आहे.
मेट्रोत नोकरी लावून देतो असे म्हणत फसवणुकीचे प्रकार या आधी नागपुरात घडले असून त्या प्रकरणात अनेक पोलीस तक्रार देखील झाली आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करत जागरुक राहून सर्व सामान्य नागरिकांनी,विशेषतः तरुणांनी अश्या भूलथापांना किंवा अफवांना बळी पडू नये हे आवाहन महा मेट्रो तर्फे केले जात आहे.