– पीएम आवास योजनेमध्ये प्रथम पुरस्कार प्रदान
नागपूर :- प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नागपूर विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना “महाआवास अभियान” पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात ‘महाआवास अभियान 2023-24 राज्यस्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ तसेच 2021-22 चे पीएम आवास योजनेतील राज्यातील सर्वोत्कृष्ट विभागाचे पुरस्कार ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास योनजेचे सचिव के.पी.पाटील, राज्यव्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ.राजाराम दिघे उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण राज्यातील सर्वोत्कृष्ट विभागामध्ये नागपूर विभाग 41.8 गुण मिळवून राज्यात प्रथम आला आहे, नाशिक विभाग 41 गुण मिळवून दुसरा तर पुणे विभाग 36.8 गुण मिळवून तृतीय ठरला. सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्वत:चे घर असावे हे सर्व सामान्य नागरिकांचे स्वप्न असून त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्र व राज्यशासन विविध योजना राबवित आहे. या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.
महाआवास अभियानाच्या माध्यमातून घरकुलांसाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुबांना घरकुल देण्याची कामगिरी देशात उत्तमरित्या सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून अपूर्ण घरे तसेच मंजूर असलेली पण बांधकाम सुरु नसलेल्या घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन प्रधान सचिव डवले यांनी केले आहे.
विभागात 91.68 टक्के घरकुलांचे उद्ष्टिय पूर्ण
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नागपूर विभागान 2 लाख 88 हजार 48 घरे बांधण्याच्या उद्दिष्टापैकी 2 लाख 64 हजार 71 घरकुलाचे बांधकाम (91.68 टक्के) करून उत्तम कामगिरी केली आहे.अपूर्ण असलेल्या घरकुलाची कामे प्राधान्याने पूर्ण करुन प्रत्येक लाभार्थ्यांना घरकुल देण्याचा प्रयत्न असल्याचे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.
पीएम आवास योजनेची नागपूर विभागाने उत्कृष्ट अंमलबजावणी करून सरस कामगिरी केली. राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुक्यांमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तसेच बहुमजली इमारती बांधण्याच्या श्रेणीमध्ये भंडारा जिल्ह्यातील ताडगाव (मोहाडी) राज्यात प्रथम आले आहे. सर्वोत्कृष्ट गृह संकुलांच्या श्रेणीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मांजरा (रे) राज्यात द्वितीय तर नागपूर जिल्ह्यातील बुधला (कळमेश्वर) तृतीय ठरले आहे. ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून यावेळी गौरव करण्यात आला.
राज्य पुरस्कृत योजनेमध्येही नागपूर विभाग उत्कृष्ट
राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये विभाग स्तरावर नागपूर जिल्हा राज्यात द्वितीय ठरला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट जिल्ह्यामध्ये भंडारा द्वितीय तर गडचिरोली जिल्हा तृतीय ठरला आहे. सर्वोत्कृष्ट तालुक्यांमध्ये भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुका राज्यात प्रथम आला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये मंजूर घरकुलांपैकी 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल अमरावती जिल्हा प्रथम तर भंडारा जिल्हा द्वितीय ठरला आहे. राज्य पुरस्कृत योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हा द्वितीय ठरला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेतील बहुमजली इमारती श्रेणीमध्ये कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायत प्रथम आल्याबद्दल ग्रामविकास मंत्री यांनी विभागीय आयुक्त तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव केला.