– लवकरच तालुका स्तरावरून वाटप होणार
यवतमाळ :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत नोंदणीकृत सक्रीय बांधकाम कामगारांना एमआयडीसी लोहारा येथे तालुकानिहाय वेळापत्रक ठरवून त्याप्रमाणे साहित्याचे वाटप सुरु करण्यात आले. परंतू इतरही तालुक्यातील कामगार साहित्यासाठी मोठ्या प्रमाणावर आले. एकाचवेळी ईतक्या कामगारांना साहित्य वाटप शक्य नसल्याने आता तालुकास्तरावर वाटप करण्यात येणार असून यवतमाळ येथून होणारे वाटप स्थगित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नोंदणीकृत सक्रीय बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आलेले होते. त्यासाठी तालुकानिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले होते. वेळापत्रकाप्रमाणे संबंधित तालुक्यातीलच कामगारांना साहित्यासाठी येणे अपेक्षित आहे. परंतु अन्य तालुक्यातील कामगार देखील मोठ्या प्रमाणावर साहित्य घेण्यासाठी येत आहे.
ज्या दिवशी ज्या तालुक्याचे वाटप करावयाचे होते, त्यावेळी इतरही तालुक्यातील बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित झाल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या कामगारांना वाटप करणे शक्य नाही. त्यामुळे सदर गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप स्थगित करण्यात आले. आता तालुक्यामधील कामगारांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणीच गृहोपयोगी संचाचे वाटप करण्याचे नियोजन असून लवकरच तालुक्याचे ठिकाणी वाटप करण्यात येईल.
मंडळाची साहित्य वाटप योजना ही नि:शुल्क असून त्रयस्थ व्यक्तिद्वारे आपली दिशाभूल, फसवणूक करण्यात येत असेल तर नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी रा.रा. काळे यांनी केले आहे.