आजनीतील ग्रामसभेत मांडले तरुणांनी विविध प्रश्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील आजनी गावातील तरुणाईला बिघडवण्याचे उपद्रवी प्रकार गेल्या काही दिवसांपासून सर्रास घडून राहिले असताना कुणीच मनावर घेत नसल्याने आता गावातील तरुण मुलच याविरोधात पुढे आल्याचे चित्र शनिवार २७ मे २०२३ ला आजनी येथे हनुमान देवस्थान हॉल मध्ये पार पडलेल्या नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांच्या पहिल्या पहिल्या वादळी ग्रामसभेत बघायला मिळाले आहे. गावाच्या विकासाच्या अन् रक्षणाच्या दृष्टीने तरुणांनी एकवटून उचललेले पाऊल खरेच कौतुकास्पद आहे

गेल्या काही दिवसांपासून आजनी ते छावणी कामठी कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर काही लोकांनी ओयो लॉज उभारून त्यामाध्यमातून काही उपद्रवी प्रकार चालविण्याचे गावातील काही तरुणांच्या लक्षात आले. या ठिकाणी चाललेली वर्दळ गावातील वातावरण दूषित करणारे असल्याने शनिवारी झालेल्या ग्रामसभेत मोठ्या संख्येने तरुणांनी एकत्र येऊन ग्राम पंचायतीला याबद्दल जाब विचारून यावर कारवाई करण्यासाठी सामूहिक निवेदन दिले आहे. वास्तविक या बांधकामाला कुणी परवानगी दिली, हे मात्र गुलदस्त्यात आहे. याशिवाय अनेकदा पोलिसांत तक्रार करून सुद्धा चोरट्या मार्गाने अवैध देशी दारू विक्रीचे प्रमाण गावात वाढलेले असल्याने गावातील तरुणाई उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी सुद्धा गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या ग्रामसभेत निवेदन दिले आहे. याशिवाय रस्ते बांधकाम, ग्राम स्वच्छता, जल व्यवस्था, धोबी नाला डम्पिंग यार्ड मधून निघणारा धूर अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचा भडिमार करून तरुणांनी ग्रामसभा दणाणून सोडली होती.

यावेळी ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच सह सर्व सदस्य गणांनी गावातील सर्व समस्यांचा निपटारा करण्याचे आश्वासन देण्यासोबत तरुणांनी सहकार्य करावे,असे आवाहन केले आहे. तरुणांनी मात्र गावातील अवैध मद्यविक्री आणि लॉज मध्ये जर देह व्यापार होत असेल तर लवकरात लवकर बंद करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन उभारण्याचा संकल्प केला आहे.

गावातील शेकडो लोकांची स्वाक्षरी असणारे हे निवेदन देताना पंचायत समिती सभापती उमेश रडके, आकाश देवतळे, अमोल गजभिये, महेंद्र भोयर, गजेंद्र ढोक, सचिन हेटे, दिलीप मेश्राम, रोहित जीवतोडे, केशव भिवगडे, रजत विघे, मनीष नखाते, निखिल भोयर, श्रीकांत गिऱ्हे, पंकज भोयर, अभिषेक फुकट, इंद्रजित वाहिले आदींची उपस्थिती होती.तर सचिव आतिष देशभ्रतार, सरपंच संजय जीवतोडे, उपसरपंच हेमराज दवंडे, सदस्य गणपत झलके, अनिकेत इंगोले, बापू भोयर व इतर सदस्यांनी निवेदन स्वीकारून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

NewsToday24x7

Next Post

विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

Sun May 28 , 2023
नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपायुक्त (सा.प्र.) प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नायब तहसिलदार आर.के. डिघोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com