राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त १ ते ६ डिसेंबर दरम्यान आयोजन : मेडिकलमध्ये दहाही झोननिहाय शिबिर
नागपूर :- नागपूर महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नागपूर आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगत्व प्रमाणपत्र विशेष मोहिम सप्ताहाचे १ डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाला उद्या गुरूवार १ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) परिसरात नेत्र विभागाच्या बाजूला जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (डी.डी.आर.सी.) येथे मनपाच्या दहाही झोननिहाय हे विशेष शिबिर ६ डिसेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर घेण्यात येत असून शिबिरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील तज्ञांमार्फत दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्राकरीता निश्चिती केली जाईल व पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये शहरातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधव आणि भगीनींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन समाजकल्याण उपायुक्त प्रकाश वराडे आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा जिल्हास्तरीय समन्वय समितीचे सदस्य सचिव किशोर भोयर यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य असते. वेळेत दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळाले नसल्याने दरवर्षी शेकडो दिव्यांगांना शासकीय तथा इतर योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई होते. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्येशाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन प्रणालीद्वारे निर्गमित दिव्यांगत्व प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या दृष्टिकोनातून निर्धारित वेळेत दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता ३ डिसेंबर रोजी विशेष शिबिर राबविण्यात येत आहे.
शहरी भागातील दिव्यांग व्यक्तींकरिता स्वावलंबन या ऑनलाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी विशेष मोहिम कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शिबिरात दिव्यांगत्वाच्या २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे दिव्यांग बोर्डाच्या तज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व तपासणी व निदान करून त्यांना स्वावलंबन या ऑनलाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या प्रचार प्रसाराचे स्टॉल देखिल लावण्यात येणार आहेत.
नागपूर शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी नागपूर शहरातील मनपाच्या दहाही झोननिहाय शिबिर वेळापत्रकानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरण आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय तज्ञ, डॉक्टर्स आणि व्यावसायिक तज्ञ डॉक्टर्स यांचेद्वारे शहरी भागातील दिव्यांग व्यक्तींची तपासणी व निदान करण्यात येईल.
प्राथमिक ऑनलाईन नोंदणी करा
सामजिक संस्था, त्यांचे पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांना तसेच दिव्यांग कल्याणार्थ कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था आणि संघटना यांना आवाहन करण्यात येते की, ज्या दिव्यांग व्यक्तींकडे जुने दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहेत किंवा दिव्यांग प्रमाणपत्र नाही, त्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता नजीकच्या नागरिक सुविधा केंद्रातील ‘कॉमन सर्विस सेंटर’ (Common Service Centre-CSC) मध्ये किंवा नजीकच्या सेतू सुविधा केंद्र मध्ये जाऊन https://www.swavlambancard.gov.in या पोर्टलवर प्राथमिक नोंदणी करून घ्यावी आणि झोन निहाय निश्चित वेळापत्रकानुसार घेण्यात येणा-या शिबिरामध्ये उपस्थित रहावे. याविषयी अधिक माहितीकरिता डी.डी.आर.सी. मधील सल्ला व मार्गदर्शन कक्षातील प्रवर्ग निहाय दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
अधिक महितीसाठी संपर्क क्रमांक
बौद्धिक दिव्यांगत्व /बहुदिव्यांग प्रवर्गातील व्यक्तींनी 7755923211, कर्ण-बधीर प्रवर्गातील व्यक्तींनी 7558495140 (SMS), अस्थिव्यंग प्रवर्गातील व्यक्तींनी 7756855077, अंध प्रवर्गातील व्यक्तींनी 7262801201, अध्ययन अक्षम/ ऑटिझम व्यक्तींनी 7385753211 आणि सिकल सेल/ थेलेसेमीया/ हेमेफिलिया बाधित व्यक्तींनी 7387095077 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
शिबिराद्वारे जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना लाभ मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी, वैद्यकीय प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक, अभिजीत राऊत आणि त्यांचे सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
@ फाईल फोटो