नागपूर :- मागील आठ महिन्यापासून 20 ऑक्टोबर 2023 पासून दीक्षाभूमी स्मारक परिसरात सामाजिक न्याय विशेष सहाय्य व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एन आय टी) च्या माध्यमातून 130 कोटी रुपयाचे विविध विकास कामे सुरू असल्याचा बोर्ड मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला आहे. या कामाला आठ महिने झाले परंतु फक्त पार्किंगच्या खोदकामा पलीकडे कुठल्याच विकास कामाला सुरुवात झालेली नाही. ऐतिहासिक स्मारका शेजारी खोदकाम व मातीचा ढिगारा हे विद्रूपीकरण आहे त्यामुळे हे काम विना विलंब थांबवावे अशी मागणी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केली आहे.
दीक्षाभूमी हे जागतिक दर्जाचे ऐतिहासिक स्थळ आहे. याला शासनाच्या वतीने अ दर्जा देण्यात आलेला आहे. भारतातल्या कुठल्याही ए दर्जाच्या ऐतिहासिक वास्तूखाली वाहनतळ बांधण्यात आलेले नाही. उलट ऐतिहासिक वास्तूला वाहन व प्रदूषणाचा धोका होऊ नये म्हणून बरेच दूर अंतरावर त्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येत असते. इथे तर शासनाने चक्क त्या वास्तूच्या खालीच खोदकाम सुरू केले ज्यामुळे त्या वास्तूला सुद्धा इजा पोहोचत आहे. याविषयी मी दोन व्हिडिओ समाज माध्यमावर यापूर्वीच टाकलेले आहेत.
अनेक वर्षाची मागणी असूनही दीक्षाभूमीच्या उत्तरेकडील चौथ्या प्रवेश द्वारासाठी अजूनही राज्याच्या कॉटन रिसर्चची जागा संपादित केलेली नाही. पूर्वेकडील आरोग्य विभागाची जागा सुद्धा संपादित केलेली नाही,
किंवा शासनाने उपलब्ध करून दिलेली नाही. उलट महामेट्रोला आवश्यकता नसताना अवाढव्य जागा उपलब्ध करून दिली. परंतु आधीच कमी पडत असलेल्या स्मारक समितीच्या मालकीच्या जागेवरच हे खोदकाम सुरू केले. वाहन तळामुळे भविष्यात या वास्तूला धोका पोहोचू शकतो म्हणून हे वाहनतळ अर्धा-एक किलोमीटर बाहेरच्या परिसरात असावे.
दीक्षाभूमी स्मारकाचे काम कित्येक वर्षापासून सुरू होते. नुकतेच कुठे आता ते संपले. काय हे सुद्धा विकास काम असेच वर्षानुवर्षे चालत राहील काय? असाही प्रश्न उत्तम शेवडे यांनी उपस्थित केलेला आहे.
काल दीक्षाभूमी स्मारक समितीने पत्र परिषद घेऊन 14 एप्रिल आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, 6 डिसेंबर, व अन्य कार्यक्रमात येणारी वाहने इथे पार्क केल्या जातील असे सांगितले. परंतु धम्मचक्र प्रवर्तन च्या निमित्ताने येणारी सर्व वाहने स्मारकाच्या एक ते दीड किलोमीटर परिसरा बाहेर थांबवल्या जातात हे नव्याने सांगण्याची गरज आहे काय?
स्फोटकाने भरलेले वाहन पार्किंग मध्ये ठेवून काही माथेफिरू अन्होनी घडवून आणू शकतात याला कसा प्रतिबंध घालाल असाही प्रश्न उत्तम शेवडे यांनी उपस्थित केलेला आहे.