– सर्व धर्मीय बांधवांकडून चंद्रपूरमध्ये जल्लोषात स्वागत
– चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा निर्धार
चंद्रपूर :- सकाळपासून माझ्या सोबतचे पदाधिकारी, कार्यकर्ते सख्ख्या भावाप्रमाणे कष्ट घेत आहेत. महिला कार्यकर्ता सकाळपासून माझ्या स्वागतामध्ये आहेत. सर्वसामान्य जनतेनेही मला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. आतापर्यंत विधानसभेच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न सोडवले आता विधानसभेसह लोकसभेचीही कामे होतील आणि ती देखील ‘डबल हॉर्स पॉवर’ने होतील, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्त केला. टिका करणाऱ्यांना १९ एप्रिललाच उत्तर मिळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रथम चंद्रपूर आगमनानिमित्त जंगी स्वागत करण्यात आले. गांधी चौकात झालेल्या सभेत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरकरांशी संवाद साधला. यावेळी आमदार संजय रेड्डी बोदकुलवार, संदीप धुर्वे, अशोक उईके, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे,भाजपा ज्येष्ठ नेते चंदेल सिंग चंदेल, लोकसभा प्रमुख प्रमोद कडू, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, निलेश मत्ते , नितीन भटारकर,बंडू हजारे , जयप्रकाश कांबळे, राजू भगत, राजू कक्कड,प्रज्वलंत कडू, रवी बेलूरकर, संतोष पारखी,सविता कांबळे ,ब्रिजभूषन पाझारे, सर्व समाजाचे धर्मगुरू, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणी एखाद्या जातीचा प्रतिनिधी म्हणून लढला नाही. प्रत्येक जण भारतमातेचा सुपूत्र म्हणून लढला. ‘भारत माता की जय’ म्हणून लढला. जातीच्या आधारावर मतदान होणे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आहे. जातीच्या आधारावर ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी देशासाठी लढणाऱ्यांचा अपमान होईल. त्यामुळे विकासावर मते मागणाऱ्यांचे मी स्वागत करतो.’ ‘मौसम टूटना नहीं चाहिए, विकास रुकना नहीं चाहिए’ असा नारा देखील त्यांनी दिला. ‘मी संसदेत जाईन तेव्हा महाराष्ट्राचा आवाज देशभर पोहोचवण्याचे कार्य करेन. हे कार्य करत असताना चंद्रपूर-वणी-आर्णी हा आघाडीचा लोकसभा मतदारसंघ व्हावा, असाही प्रयत्न करेन. मला लोकसभेत पाठविले तर तुम्हाला तुमचा निर्णय योग्य ठरल्याचा आनंद वाटेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज देशगौरव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी संधी दिली असून या संधीचे सोने करण्यासाठी जनता पूर्ण सहकार्य करेल याचा विश्वास आहे. पण त्याचवेळी विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही, या सूत्रावरच काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मुस्लीम बांधवांचे प्रेम विसरणार नाही’
मी कधी हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई असा फरक केला नाही. धर्म, पूजापद्धती वेगळी असेल पण शेवटी प्रत्येक मुस्लीम बांधव माझ्या भारतमातेचा सुपुत्र आहे. इथे असलेल्या मुस्लीम बांधवांनी जे प्रेम केले ते विसरू शकत नाही. म्हणूनच १५ तारखेला मुख्यमंत्र्यांना सांगितले आणि मुस्लीम बांधवांसाठी विशेष निधी मंजूर करून घेतला, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
एकाच दिवशी २४ हजार लोकांची बॉटनिकल गार्डनला भेट
मी नेहमी या जिल्ह्याच्या विकासासाठी काम केले. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन निर्माण केले. आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी इथे यावे म्हणून तीन महिने निःशुल्क प्रवेश ठेवला आहे. रविवारी तर २४ हजारावर लोकांनी गार्डनला भेट दिली, असे सांगून ना. मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. माझ्या जिल्ह्यातील कोणत्याही जाती, धर्माची, गरीब, श्रीमंताची, धनवान, निर्धनाची माझी बहिण असेल तिला आता ६०० कोटी खर्च करून बनत असलेल्या एसएनडीटी युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेता येणार आहे. शिक्षणामध्ये गरीबी आडवी येणार नाही. आकाशाने हेवा करावा असे उत्तम शिक्षण तिला प्राप्त होणार आहे. मी सरकारशी चर्चा केली, गरीबाची मुलगी असेल तर तिचे शिक्षण आता मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात होऊ शकेल, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
आर्णी माझे आजोळ
मी १९८९ मध्ये चंद्रपुरातील सरदार पटेल महाविद्यालयात एम.फिल चा विद्यार्थी होतो. त्यावेळी १९८९ ची लोकसभा लढवली. त्या लोकसभेला सुद्धा मी असाच गांधी चौकात सभेला उभा राहायचो. तरुण, विद्यार्थी, कार्यकर्ते या शहरातील, जिल्ह्यातील जनता माझे मनोगत ऐकण्यास यायची. प्रेम व्यक्त करायची. तेव्हा मी युतीचा उमेदवार होतो. आताही महायुतीचे सर्व आमचे नेते इथे उपस्थित आहेत. या अशा नात्यांविषयी विचार करताना पुन्हा एक बाब लक्षात आली. या लोकसभेत वणी आणि आर्णी असे दोन मतदारसंघ जोडले गेलेत. खरंतर आर्णी म्हणजे माझे आजोळ. मी लहानपणी एक ते दीडमहिना आजोळी आर्णीतील बोरगावमध्ये असायचो. आजोळची सेवा करण्याची अशी संधी चालून येईल, असेही वाटले नव्हतते, या शब्दांत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आठवणींना उजाळा दिला.
वणीसोबतही आगळे ऋणानुबंध
आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार प्रतिनिधित्व करीत असलेल्या वणी विधानसभेशी देखील माझे नाते राहिले आहे. वणीमध्ये १९८४मध्ये डीबीएम चा विद्यार्थी म्हणून तेथील लोकमान्य महाविद्यालयात शिकायला जायचो. तेथील एका चौकात राहायचो. ज्या वणी मतदारसंघात सावंगी, अडेगाव, आमजोर या गावामध्ये आमची शेती होती. त्याच वणीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळेल, असे कधीही वाटले नव्हते, असेही ते म्हणाले.
तेलगू-मराठी- बंगाली साहित्य अकादमी
चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. रस्ते झाले, एपीजी अब्दुल कलाम गार्डन झाले, बाबूपेठचे स्टेडियम झाले. पोलिसांसाठी जिम केले. कामे तर खुप केली. पण मनात विचार केला की, शेवटी विकासासोबत भाषा आणि एकमेकांचे प्रेम वाढायचे असेल तर साहित्याचे आदान प्रदान होणे महत्वाचे आहे. आज मी अभिमानाने सांगत आहे, मी आता तेलगू-मराठी- बंगाली साहित्य अकादमी तयार केली. त्यामुळे आता तेलगू भाषिक, मराठी भाषिक आणि बंगाली भाषिकांमध्ये ऋणानुबंध तयार होणार आहेत, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.
विकासकामांची मालिका
कॅन्सर हॉस्पीटल, मेडिकल कॉलेज, चंद्रपूरची वन अकादमी तर असणारच आहे, शिवाय चंद्रपूरमध्ये आता २०० कोटींचे होणारे गोंडवाना विद्यापीठाचे केंद्र लक्षणीय ठरणार आहे. चंद्रपुरात बाबा आमटेंची अभ्यासिका स्थापन होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना, चंद्रपूर शहराची अमृत पाणीपुरवठा योजना, मलनि:स्सारण योजना अशा कितीतरी कामांची उदाहरणे देता येतील. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे कल्याणकारी महामंडळ काढले आणि ५० कोटी रुपयांचा निधी दिला, असेही त्यांनी सांगितले.