नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात विविध मागण्यांच्या निवेदनांची गर्दी झाली. ना. गडकरी यांची भेट घेण्यासाठी सकाळपासून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी अनुकंपा, बदली यासारख्या विषयांसह रस्त्यांच्या मागणीचे निवेदनही मंत्री महोदयांना देण्यात आले.
खामला येथील ज्युपिटर शाळेच्या शेजारी ना. गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात विविध संस्था, संघटनांचे लोक आपली निवेदने घेऊन पोहोचले. याशिवाय व्यक्तिगत समस्या मांडण्यासाठीही लोकांनी मंत्री महोदयांची भेट घेतली. यामध्ये विशेषत्वाने बदलीसाठी, अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी, नवीन रस्त्यांच्या मागणीसाठी लोकांनी निवेदने दिली. ना. गडकरी यांनी निवेदने स्वीकारून लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. यासोबतच मलवाहिन्या, वीजजोडणी आदींच्या संदर्भातील तक्रारीही नागरिकांनी मांडल्या.
दिव्यांग बांधवांनी कृत्रिम अवयवांसाठी निवेदने दिली. कुणाला पायाची तर कुणाला हाताची आवश्यकता आहे. त्यांना आवश्यक मदत करण्याच्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना ना. गडकरी यांनी दिल्या. नागपुरातील विविध संस्थांच्या महिलांनी ना. गडकरी यांना नवरात्रातील उपक्रमांचे निमंत्रण दिले. वैद्यकीय मदतीसाठी देखील अनेकांनी अर्ज केले. कुणी उपचारासाठी तर कुणी औषधांसाठी सहकार्य करण्याची विनंती ना. गडकरींना दिली. त्यादृष्टीने तातडीने मदत करण्याच्या सूचना ना. गडकरी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. अनेकांनी आपली प्रकाशित पुस्तके ना.गडकरी यांना भेट देऊन त्यावर अभिप्राय देण्याची विनंती केली.