पोलिस अधीक्षकांकडे तक्रार : प्रक्षोभक वक्तव्याचे महाराष्ट्रभर पडसाद
अमरावती :- दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी कर्मचाऱ्यांना पेन्शन नव्हे तर उलटे लटकून फटके मारा असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर या वक्तव्याचे महाराष्ट्रभर पडसाद उमटण्यास सुरूवात झाल्याने त्यांना जीवे मारण्याच्या धमकी काँलवरून येत असल्याची तक्रार त्यांनी अमरावती जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी आक्रमक भूमिका घेत जुन्या पेन्शनसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आसूड ओडत त्यांना ‘पेन्शन नव्हे तर उलटे लटकून फटके मारा’ असे प्रक्षेभक विधान केले होते. या विधानानंतर महाराष्ट्रभरातून सोनटक्के यांच्या निषेधाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तर काहींनी सोनटक्के यांना फोन करून थेट जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मैदानात उतरलेले कर्मचारी विरूद्ध नकुल सोनटक्के असे समीकरण झाल्याने सोनटक्के यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात त्यांना दिवसभरात तीन ते चार वेगवेगळ्या नंबर वरून कॉल आले. या कॉल्समध्ये त्यांनी सोनटक्के यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच अरेरावीची भाषा केली. या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिल्याची माहिती आहे. एकीकडे सोनटक्के यांच्या वक्तव्यावरून आक्रमक झालेले कर्मचारी तर दुसरीकडे सोनटक्के यांचे समर्थक सुद्धा आक्रमक होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण उद्भवू शकते. त्यामुळे सोनटक्के यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी होत आहे.
सोनटक्के यांची आज पत्रकार परिषद
महाराष्ट्रातून सोनटक्के यांना येत असलेल्या धमक्या तसेच कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळे राज्य शासनावर पडणारा भुर्दंड, सर्वांना असलेला समानतेचा अधिकार असताना शेतकरी, कामगार, मजूर विद्यार्थी या सर्वांचे प्रश्न प्रलंबित असताना कर्मचाऱ्यांच का लाड पुरवायचा या प्रश्नावर सोनटक्के हे सप्रमाण माहिती देऊन भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच तापलेले आहे. कर्मचाऱ्यांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद न देता शासनाविरूद्ध पुकारलेला बंड ही लोकशाही नसून ही कर्मचाऱ्यांची हुकूमशाही आहे, त्याची ही हुकूमशाही कधीच खपवून घेणार नसल्याचा इशारा सुद्धा नकुल सोनटक्के यांनी दिला आहे.