नागपूर :- भोंदू लोकांकडून केल्या जाणाऱ्या जादूटोण्याच्या व भूतपिशाच प्रयोगातून जनतेचे होणारे शोषण व फसवणूक टाळण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. तसेच, जादुटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची बैठक झाली. सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, पोलीस निरीक्षक सर्वश्री गजानन विखे, जयपालसिंह गिरासे, छगन कापसे यावेळी उपस्थित होते.
भूतबाधा होणे, अंगात देव येणे, जादूटोणा आदी दृष्ट प्रथांविरोधात समाजात विशेषत: अशा घटना घडणाऱ्या भागात विशेष शिबीरे घेवून जनजागृती करावी, यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी व सामाजिक संस्थांची मदत घ्यावी असे बिदरी यांनी सांगितले. विभागीय समितीमध्ये अशासकीय सदस्यांची निवड करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी सामाजिक न्याय विभागाला दिल्या.
राज्य शासनाने २०१३ मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम-२०१३’ पारित केला आहे. या अधिनियमांतर्गत २०२३ मध्ये मे महिन्याअखेरपर्यंत नागपूर जिल्ह्यात आठ व गोंदिया जिल्ह्यात दोन असे नागपूर विभागात एकूण १० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर २०२२ मध्ये विभागात एकूण १८ गुन्हे नोंदविण्यात आले असल्याचे डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी सांगितले.