मनपाच्या अपूर्व विज्ञान मेळावा-२०२१ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

-शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले विज्ञानाचे धडे

नागपूर, ता. १६ : नागपूर महानगरपालिकेच्यावतीने असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एजुकेशन (एआरटीबीएसई) यांच्या सहकार्याने झाशी राणी चौक येथील राष्ट्रभाषा भवन येथे आयोजित अपूर्व विज्ञान मेळावा-२०२१ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध खासगी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक या मेळाव्याला भेट देऊन विज्ञानाच्या विविध प्रयोगांविषयी माहिती जाणून घेत आहेत. विशेष म्हणजे अपूर्व विज्ञान मेळाव्यात सर्व प्रयोग सहज उपलब्ध होतील अशा वास्तूंपासून करून दाखविण्यात येत आहेत.

अपूर्व विज्ञान मेळावा हा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संकल्पना रुजविणारा तसेच त्यांना हसत खेळत विज्ञान शिकविणारा मेळावा आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च बघावे, समजून घ्यावे, शिकावे व स्वत: करून पाहावे, या उद्देशाने या विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित या विषयांतील जवळपास शंभर प्रयोग करून दाखविण्यात येत आहेत. या विज्ञान मेळाव्याला शहरातील सर्व शासकीय व खासगी शाळांमधील विद्यार्थी भेट देत आहेत.

अपूर्व विज्ञान मेळावा राष्ट्रभाषा भवनात १९ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार आहे. यात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून विविध प्रयोग करून दाखवले जात आहेत. तसेच देशभरातून आलेले प्रतिनिधीही विज्ञानातील बारकावे रंजक पद्धतीने समजावून सांगत आहेत. अपूर्व विज्ञान मेळावा मनपा शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अनोखी संधी आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान आणि संवाद कौशल्य विकसित होत असून समाजात विज्ञान शिक्षणाबद्दल जागरुकता सुद्धा वाढते. त्यामुळे शहरातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी या अपूर्व विज्ञान मेळाव्याला भेट देण्याचे आवाहन मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी केले आहे.

प्रत्यक्ष अवयव दाखवून दिली जात आहे अवयवांच्या कार्याची माहिती

यंदा अपूर्व विज्ञान मेळाव्यात आकर्षणाचा विषय म्हणजे येथे प्रत्यक्ष बकरीचे मेंदू, फुफ्फुस दाखवून या अवयवांबद्दल आणि त्यांच्या कार्याची माहिती श्री गुरु गोविंदसिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अँड ज्यूनियर कॉलेजचे विद्यार्थी देत आहेत. यामध्ये तसमिया खान, सिमरन शर्मा, हिमाक्षी यादव या विद्यार्थिनींचा सहभाग आहे. यात अवयव दाखवून त्याची रचना, ते प्रत्यक्ष कार्य कसे करते याविषयी सखोल माहिती भेट देण्याऱ्या विद्यार्थ्यांना देत आहेत.

अनेक विद्यार्थ्यांना माहिती आहे की, मानवी शरीर हे विविध अवयवांच्या माध्यमातून बनलेले आहे. मात्र आपल्याला दिसणारे अवयव सोडल्यास अन्य अवयव विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बघितलेले नसतात. ते कसे दिसतात, ते कार्य कसे करतात याविषयी त्यांना माहिती नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा शरीराच्या आतील महत्वाचे अवयव बघता यावे, या अवयवांबद्दल त्यांना विस्तृत माहिती मिळावी या उद्देशाने यंदा अपूर्व विज्ञान मेळाव्यात बकरीचे मेंदू आणि फुफ्फुस दाखवून त्यांच्याबद्दल माहिती देण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

तामसवाडीत भागवत सप्ताह उत्साहात

Thu Dec 16 , 2021
बेला : जवळच्या आष्टा पाटीवरील तामसवाडी येथील शिवमदिरात गीता जयंती निमित्त पार पडलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहास भाविक भक्तांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी ह .भ .प. लक्ष्मणराव देशमुख महाराज यांचे सुश्राव्य प्रवचनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमनबाई तेलरांधे यांच्या पुढाकारातून संपन्न होणाऱ्या धार्मिक उत्सवाचे यंदा दहावे वर्ष आहे.    देशमुख महाराजांच्या हस्ते बुधवार ८ डिसेंबरला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com