१२ बांधकामधारकांवर मनपाची कारवाई
चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत बांधकाम करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था करणे अनिवार्य असून, त्यासाठी इमारत बांधकाम परवानगी देताना छताच्या आकारानुसार व मजलानिहाय अनामत रक्कम आकारण्यात येते. मात्र, शहरातील ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून, रेनवॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था केल्याचे पुरावे सादर केलेले नाही, अशा १२ बांधकामधारकांची अनामत रक्कम महानगरपालिकेने जप्त केली आहे.
शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता आहे. पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत रेन वॉटर हार्वेस्टींग उपक्रम हाती घेण्यात आला आहे रेन वॉटर हार्वेस्टींगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मालमत्ताधारकांना मनपाकडून घराच्या छताच्या आकारमानानुसार ५ हजार, ७ हजार, १० हजार असे वाढीव अनुदान तथा पुढील ३ वर्षापर्यंत मालमत्ता करात २ टक्के सूट देण्यात येत आहे.
आयुक्त राजेश मोहीते यांच्या निर्देशानुसार सदर कारवाई करण्यात आली असुन परवानगीधारक बांधकामदारांना रेन वॉटर हार्वेस्टींग करण्यासाठी यापुर्वी १५ दिवसांचा वेळ देण्यात आला होता, मात्र त्यांनी या कालावधीत रेन वॉटर हार्वेस्टींग केल्याचे पुरावे सादर न केल्याने भानापेठ प्रभाग येथील ४, तुकुम येथील ३, छत्रपती नगर येथील २,जटपुरा गेट येथील १, रामनगर येथील २ अश्या एकुण १२ बांधकाम परवानगी धारकांची अनामत रक्कम जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील विहीर, बोअरवेल धारकांनाही रेन वॉटर हार्वेस्टींग करणे बंधनकारक असुन त्यांना १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या कालावधीत रेन वॉटर हार्वेस्टींग न केल्यास २० हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात येणार असल्याने सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टींग करून घ्यावे असे आव्हान मनपातर्फे करण्यात येत आहे.