भारतीय राज्यघटना जीवंत करार – डॉ. वेदप्रकाश मिश्रा

विद्यापीठात समता सप्ताहनिमित्त व्याख्यान संपन्न

अमरावती :- भारतीय राज्यघटना चेतना आहे, अस्मिता आहे. ते एक जीवंत दस्तावेज असून भारतीयांसाठी जीवंत करार असल्याचे प्रतिपादन नागपूर येथील सुप्रसिध्द वक्ते डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने समता सप्ताहाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ‘भारतीय राज्यघटना : एक जीवंत गतिमान करार’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते.

डॉ. मिश्रा विषयाची मांडणी करतांना म्हणाले, भारतीय राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, प्रतिष्ठा, आत्मसन्मान, नागरिकत्व ही मूल्ये दिलेली आहेत. या मूल्यांसाठी घटनेने केवळ आस्तच केले नाही, तर गॅरंटी सुध्दा दिली आहे. मानवी मूल्यांची जडणघडण, व्याप्तीचा गोषवारा मूलभूत अधिकारामध्ये दिला आहे. नागरिकांना केवळ एक मत एक मूल्य न देता राजकीय, सामाजिक व आर्थिक समानता असावी यावर बाबासाहेबांनी भर दिला. त्यांनी जनतेला दिलेले अधिकार दानाच्या स्वरुपात नाही, तर मूलभूत स्वरुपात दिले. घटनेने नागरिकांना दिलेल्या अधिकाराचा वापर नागरिक करीत आहे. ख-या अर्थाने लोकशाहीची ती श्रीमंती आहे.

या देशात कुठल्याच बाबतीत भेदाभेद होणार नाही, याची दक्षता बाबासाहेबांनी राज्यघटनेत तशी तरतूद करून घेतली आहे. अस्पृश्यताबंदी आणून चांगल्या जीवनमूल्यावर त्यांनी मूलभूत अधिकाराच्या स्वरुपात भर दिला. यासाठी त्यांना तात्वीक विरोधाभास सहन करावा लागला. फ्रेंचक्रांतीला पुढे नेत त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये घटनेत दिली. बंधुतेशिवाय समता शक्य नाही, यावर त्यांचा भर होता. मनाच्या स्वातंत्र्याशिवाय बंधुता अधुरी आहे. राज्यघटनेचा आत्मा उद्देशिकेमध्ये आहे. खंत व्यक्त करतांना ते म्हणाले, लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादीत नको. आपण गणतंत्र दिवस दरवर्षी साजरा करतो, परंतु आजही या देशात अनेक लोकांची भुक भागविल्या जात नाही. नागरिकांना मिळालेल्या मूलभूत अधिकाराचा वापर करतांना त्यांनी जबाबदारीची जाणीव सुध्दा ठेवली पाहिजे. जीवन व स्वातंत्र्य हा राज्यघटनेचा जीवंतपणा आहे. अनेक देशाने आपले संविधान बदलविले, पण आपल्या देशाचे संविधान अमेय आहे. आपल्या संविधानामध्ये जो चिकित्सक अभ्यास व मांडणी झालेली आहे, ती जगातील 124 देशांच्या संविधानात झालेली नाही.

राज्यघटना बदलाच्या तरतूदी सुध्दा दिलेल्या आहेत. 368 कलमान्वये तो बदल केल्या जावू शकतो. 122 वेळा घटनेत बदल केला, पण घटनेचा गाभा तसाच आहे, तोच ख-या अर्थाने घटनेचा जीवंतपणा आहे. तो कधीही बदलल्या जावू शकत नाही. डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली अमानत, धरोहर जपण्याची सर्व प्रबुध्द नागरिकांची जबाबदारी असल्याचे सांगून संविधान दीर्घायुष्य हेच भारताचे चिरायू आहे, असे ते म्हणाले.

व्य.प. सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले, कायद्यानुसार राज्य चालले पाहिजे. प्रत्येक संस्थेने कायद्याच्या चाकोरीत कामे करावे ही अपेक्षा संविधानात आहे. अध्यक्षीय भाषण करतांना प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर म्हणाले, समता सप्ताहनिमित्त विविध मान्यवरांच्या विचारांचे प्रदान नवयुवक विद्याथ्र्यांना होत आहे. ज्ञानाचा प्रसार करणे विद्यापीठाचे कर्तव्य असून आमचे विद्यार्थी ज्ञानोपासक होऊन या देशाच्या घडणघडणीत मोलाचा सहभाग देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करुन बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून दिलेल्या मूलभूत अधिकारासोबत जबाबदारीची जाणीव ठेवावी असेही ते म्हणाले.

विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांनी डॉ. मिश्रा यांचा सत्कार केला. प्रास्ताविक डॉ. बनसोड यांनी केले. संचालन उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील यांनी, तर आभार डॉ. अभिजित इंगळे यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, विविध प्राधिकारिणींचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतरत्न बाबासाहब डॉ भीमराव आंबेडकर को टीम वेकोलि की आदरांजली

Fri Apr 14 , 2023
नागपूर :-वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड में आज भारतरत्न बाबासाहब डॉ भीमराव आंबेडकर को भावभीनी आदरांजलि अर्पित की गयी. मुख्यालय में आयोजित समारोह में प्रमुख अतिथि निदेशक तकनीकी (संचालन) जे पी द्विवेदी, निदेशक तकनीकी (योजना/परियोजना) ए के सिंह तथा सीवीओ अजय मधुकर म्हेत्रे ने महामानव डॉ भीमराव आंबेडकर की जयंती पर उन्हें श्रद्धा-सुमन अर्पित किये. समारोह में उपस्थित विभाग प्रमुख एवं अन्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com