बाडमेर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभा निवडणुकीत पराभव घडवून आणणाऱ्या काँग्रेसने भारतीय संविधानाचा अनेकदा अवमान केला आहे. आणीबाणी लादून संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला शिक्षा करा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाडमेर (राजस्थान) येथे झालेल्या प्रचंड जाहीर सभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. विकासविरोधी काँग्रेसने भाषा, जातीपातीच्या आधारावर देश तोडण्याचे कुटील कारस्थान रचले आहे असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानातील सर्व जागी भाजपा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले. या सभेला मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, बाडमेर-जैसलमेरमधील भाजपाचे उमेदवार कैलाश चौधरी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, निवडणुकाआल्या की संविधानाच्या नावाखाली खोटे बोलणे ही इंडी आघाडीतील सर्व घटक पक्षांना सवय झाली आहे. काँग्रेसने मुद्दाम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत केले. आंबेडकरांना भारतरत्न मिळू दिले नाही. काँग्रेसने देशात आणीबाणी लादून राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आज हेच काँग्रेस नेते मोदींना शिव्याशाप देण्यासाठी संविधानाच्या नावाखाली खोटा प्रचार करत आहेत. डॉ. आंबेडकरांचा सन्मान करण्यासाठी मोदी सरकारने पहिल्यांदा देशात संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली. बाबासाहेबांशी संबंधित पंचतीर्थांचा विकास केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे दिसून येते की, काँग्रेसने दिलेली आश्वासने आत्यंतिक द्वेषाने भरलेली आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगचा प्रभाव दिसून येतो. इंडी आघाडीत समाविष्ट असलेल्या आणखी एका पक्षाने देशाविरोधात अत्यंत धोकादायक घोषणा केल्या आहेत. भारताची अण्वस्त्रे आम्ही नष्ट करू, असे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. भारतासारखा देश ज्याच्या दोन्ही बाजूंच्या शेजारी देशांकडे अण्वस्त्रे असताना आपण अण्वस्त्रे नष्ट करणे योग्य आहे का, काँग्रेसच्या या इंडी आघाडीला कोणत्या दबावाखाली भारताची अण्वस्त्रे संपवायची आहेत, असे धारदार सवालही पंतप्रधान मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतमातेसाठी लष्कराचे जवान प्राणांची आहुती देतात. काँग्रेस मात्र भारतमातेला फक्त जमिनीचा तुकडा मानते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजस्थानच्या शूरवीरांच्या भूमीवर येऊन कलम 370 हटवण्यावर आणि राजस्थानमधील संबंधांवर प्रश्न उपस्थित करतात.राजस्थानच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह लावण्याचे धाडस ते करतात. ज्या राजस्थानच्या वीरांनी सीमेवर काश्मीरसाठी छातीत गोळ्या झाडल्या, त्या राजस्थानला हे लोकविचारतात, राजस्थानचा काश्मीरशी काय संबंध? बाडमेरचे सुपुत्र भीखाराम मुंड यांनी कारगिल युद्धात बलिदान दिले होते. काँग्रेस नेते म्हणतात राजस्थानचा काश्मीरशी काय संबंध? ज्या राजस्थानात काश्मीरमध्ये जन्मलेल्या बाबोसा रामदेव यांची घराघरात पूजा केली जाते, तिथे काश्मीरचा राजस्थानशी काय संबंध, असा प्रश्न ही काँग्रेस विचारते. जेव्हा काश्मिरी हिंदूंना घरातून हाकलून दिले, तेव्हा अनेक कुटुंबांना राजस्थानने सामावून घेतले. असे असूनही काँग्रेस नेते विचारतात की राजस्थानचा काश्मीरशी काय संबंध आहे.
मोदी म्हणाले की, आज देशातील 4कोटी गरीबांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे मिळाली आहेत, त्यापैकी 1 लाख75 हजार गरीबांना बाडमेरमध्येही कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. भाजपा सरकार देशाच्या शेवटच्या सीमेपर्यंत रस्ते आणि महामार्ग बांधत आहे. भाजपा सरकारने बाडमेरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले असून आज सीमावर्ती बाडमेरमध्ये 72 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेली रिफायनरी सुरू होणार आहे. येथे काँग्रेसचे सरकारनसते तर भाजपाच्या दुसऱ्या कार्यकाळात या रिफायनरीचे उद्घाटन झाले असते, मात्र भाजपाच्या तिसऱ्या कार्यकाळात या रिफायनरीचे उद्घाटन नक्कीच होणार आहे. आगामी काळात याभागातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. बाडमेरमधून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत होते. गुजरातच्या कच्छमध्येही अशीच परिस्थिती होती, परंतु 2001 नंतर जेव्हा गुजरातने मला सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा आज कच्छ जिल्ह्याची गणना देशातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये होते. कच्छमधील जमिनींचा भाव मुंबईच्या जमिनी एवढा झाला आहे. जर कच्छ बदलू शकते तरबाडमेरही बदलू शकते. काँग्रेस सरकारने बाडमेरमध्ये विमानतळ बांधू दिले नाही. राजस्थानला काँग्रेसपक्षाने पाण्यासाठी देखील तहानलेले ठेवले. काँग्रेस सरकारने राजस्थानमधील जल-जीवनमिशनमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. राजस्थानला पाणी आणण्यासाठी ईआरसीपी प्रकल्प पूर्ण होऊ दिला नाही. जलजीवन मिशनच्या माध्यमातून भाजपा सरकारने राजस्थानमधील 50 लाख घरांना पाणीपुरवठा केला. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या भाजपा सरकारने ईआरसीपी प्रकल्प अवघ्या 100 दिवसांत मंजूर करून घेतला. हरियाणा बरोबर पाणी करारही झाला आहे. राजस्थानमध्ये प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचा भाजपाचा संकल्प आहे.
काँग्रेसची विचारसरणी विकास विरोधी आहे. हे लोक देशाच्या सीमावर्ती गावांना देशाची शेवटची गावे म्हणतात. या लोकांनी जाणीवपूर्वक सीमावर्ती जिल्हे व गावे विकासापासून वंचित ठेवले, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेसला भाषा, प्रदेश आणि जातीपातीच्या आधारावर भारत तोडायचा आहे, त्यामुळे या निवडणुकीत जनतेला पुन्हा एकदा काँग्रेसला चांगलाच धडा शिकवावा लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेस राष्ट्रहितासाठी केलेल्या प्रत्येककामाला विरोध करते आणि प्रत्येक देशविरोधी शक्तीच्या पाठीशी उभी असते. राजस्थानसह संपूर्ण देशात शक्ती आणि मातेची पूजा केली जाते, परंतु काँग्रेसचे युवराज हिंदू धर्माची शक्ती नष्ट करण्याची भाषा करतात. या लोकांना माता-भगिनींची शक्ती माहीत नाही, सत्ता नष्ट करण्याच्या गप्पा मारणाऱ्यांना देशाच्या माता-भगिनीच सामोरे जातील. काँग्रेस रामलालाच्या प्राणप्रतिष्ठापनेवर बहिष्कार टाकते, पण रामनवमीला रामभक्तांवर दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांना संरक्षण देते. काँग्रेस देशात येणाऱ्या घुसखोरांचे स्वागत करते, पण ‘’सीएएला’’ विरोध करते. राजस्थानमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकण्याचा अधिकार नाही. भाजपाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि मोदींच्या हमीवर विश्वास ठेवून, देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करून, विकसितभारताचा संकल्प पूर्ण करण्यात महत्त्वाचे योगदान द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.