वेल्लोर :- ‘सनातन’ नष्ट करणे हे काँग्रेस आणि द्रमुकचे लक्ष्य आहे. हिंदू धर्मात अस्तित्त्वात असलेली शक्ती नष्ट करू, असे म्हणणारे काँग्रेसचे युवराज आणि सनातनच्या विनाशाच्या चर्चा करणारी द्रमुक यांची मानसिकता एकच असल्याने काँग्रेस व द्रमुक हे देशात एकत्रपणे भेदभाव आणि विनाशाचा खेळ खेळत आहेत, अशी भेदक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूमधील वेल्लोर आणि मेत्तुपलयम (कोयंबतूर) येथे झालेल्या विशाल जाहीर सभेत बोलताना केली.
कौटुंबिक राजकारण, भ्रष्टाचार आणि तामिळ विरोधी संस्कृतीला प्रोत्साहन देणारी द्रमुक ही एका कुटुंबाची कंपनी बनली आहे. द्रमुकच्या कौटुंबिक राजकारणामुळे तामिळनाडूतील तरुणांना पुढे जाण्याची संधी मिळत नाही. काँग्रेस आणि द्रमुकसारखे घराणेशाही पक्ष तरुणांच्या आकांक्षा कधीच पूर्ण करू शकत नाहीत, याची जाणीव असल्यामुळेच रालोआच्या सकारात्मक कामांना लोकांचा पाठिंबा मिळत असून भाजपा प्रणित ‘एनडीए’ मुळेच तामिळनाडूतून द्रमुकला निरोप मिळेल, ही जनतेची भावना आहे, असे मोदी म्हणाले. द्रमुकने तामिळनाडूला जुन्या घराणेशाहीच्या राजकारणात गुरफटवून ठेवले नसते, तर तामिळनाडूने विकसित देशाचे नेतृत्व केले असते. द्रमुकचे कौटुंबिक राजकारण, भ्रष्टाचार आणि तामिळविरोधी संस्कृती यांमुळे तामिळनाडूचा विकास रोखला गेला, अशा शब्दांत त्यांनी द्रमुकच्या घराणेशाही राजकारणावर कोरडे ओढले. भ्रष्टाचाराचा पहिला ‘कॉपीराइट’ द्रमुकला मिळाला असून एक संपूर्ण कुटुंब मिळून तामिळनाडूला लुटत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
भेदभाव आणि विभाजनाचा जो धोकादायक खेळ काँग्रेस देशात खेळते, तोच खेळ द्रमुक तामिळनाडूत खेळत आहे. तामिळनाडूचा विकास हा द्रमुकच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कधीच राहिला नाही. काँग्रेसनेही विकासाचे राजकारण केले नाही, तामिळनाडूत द्रमुकही काँग्रेसचेच अनुकरण करत आहे. काही दशकांपूर्वी काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी श्रीलंकेला कच्चाथिवू बेट दिले होते. हा निर्णय कोणाच्या फायद्यासाठी घेतला यावर आता काँग्रेसने मौन बाळगले, असा आरोप त्यांनी केला. आज देश ‘मेक इन इंडिया’कडे वाटचाल करत आहे, पण देशातील गुंतवणुकीचा ओघ रोखणाऱ्या प्रवृत्तींना द्रमुक पाठिंबा देत आहे. 21 व्या शतकात आपल्याला एकत्रितपणे भारत आणि तामिळनाडूचा विकास करायचा आहे. गेल्या दहा वर्षांत ” एनडीए” च्या केंद्र सरकारने विकसित भारताचा पाया रचला आहे. 2014 पूर्वी भारताकडे कमकुवत देश म्हणून पाहिले जात होते. देशात रोज फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या बातम्या झळकत होत्या. देशाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते असे म्हटले जात होते. मात्र, आज भारत संपूर्ण जगासमोर एक शक्ती म्हणून उदयास येत आहे आणि यामध्ये तामिळनाडूचा मोठा वाटा आहे. अंतराळ क्षेत्रात भारताला पुढे नेण्यात तामिळनाडूने मोठे योगदान दिले आहे, अशा शब्दांत त्यांनी तामिळनाडूचा गौरव केला.
इंडीया आघाडीतील पक्षांनी अनुसूचित जाती – जमाती आणि अन्य मागासवर्गीयांच्या विकासात अनेक वर्षांपासून अडथळे आणले. कोट्यवधी लोकांना घर, वीज आणि पाण्यासाठी अतोनात त्रास दिला, पण भाजपा सरकारने 80 कोटी लोकांना मोफत धान्य, 4 कोटी लोकांना घरे आणि प्रत्येक गावात वीज पोहोचवली आहे. तामिळनाडूत द्रमुक सरकार मात्र, केंद्राच्या नळपाणी योजनेचे लाभ देण्याबाबत पक्षपातीपणा करत आहे. काँग्रेसने दशकांपूर्वी गरिबी हटवाचा नारा दिला, पण गरिबी हटली नाही, पण रालोआ सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, असे ते म्हणाले.