– घरकुलाचे काम 100 दिवसात पुर्ण करावे
नागपूर :- अमृत महाआवास अभियानांतर्गत लाभार्थ्यांना मंजूर करण्यात आलेले घरकुल 100 दिवसात पुर्ण करणे अपेक्षीत आहे. यादृष्टीने मंजूर घरकुलांचे काम तातडीने पुर्ण करण्यासाठी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांनी ग्रामपातळीवरील यंत्रणेला कामाला लावून ही कामे गुणवत्तापुर्ण व गतीने पुर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.
अमृत महाआवास अभियान 2022-23 च्या विभागीस्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त बिदरी यांनी नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा व गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच योजना राबविणाऱ्यां यंत्रणांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संपर्क साधून त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपायुक्त (विकास) विवेक इलमे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त (विकास) स्वाती इसाये, सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे, सहाय्यक आयुक्त नयन कांबळे, विभागीय कायक्रम अधिकारी शुभम हर्षे प्रामुख्याने उपस्थित होते.
विभागीय आयुक्त यांनी पुढे सांगितले की आता पावसाळा संपला असल्याने घरकुलाच्या कामात पावसाचा व्यत्यय येणार व नुकसान होणार नाही. या संधीचा लाभ घेत सर्व योजनांची कामे लवकर सुरू करून गतीने पुर्ण करावी. अमृत महाआवास अभियान -2022-23 चा कालावधी 20 नोव्हेंबर 2022 ते 31 मार्च 2023 असा आहे. या अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अतिक्रमण नियमानुकूल करणे, पंडित दिनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना या ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास प्राधाण्य द्यावे.
गृहनिर्माण योजनांमध्ये शासकीय यंत्रणा व पंचायतराज संस्था यांचेबरोबरच लायन्स क्लब, रोटरी क्लब, सहकारी संस्था, खासगी संस्था, तंत्र शिक्षण संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ, इत्यादी समाजातील घटकांचा सक्रीय सहभाग वाढविणे, भागधारकांची क्षमताबांधणी करणे, मंजूरी दिलेल्या लाभार्थ्यांना 7 दिवसाच्या आत पहिल्या हप्त्याचे वितरण करणे, लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृतिसंगम घडवून आणणे, गृहनिर्माण योजनांचे सामाजिक लेखापरिक्षण करणे तसेच 16 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयातील सूचनाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त यांनी दिल्या.
उपायुक्त विवेक इलमे यांनी सादरीकरणाद्वारे योजनेची माहिती दिली. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत दोन लाख 95 हजार 672 घरकुलाचे उद्दिष्ट होते, त्यापैकी दोन लाख 74 हजार 98 घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून दोन लाख आठ हजार 753 घरकुलांचे काम पुर्ण झाले आहे. तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर विभागाला एक लाख एक हजार 492 घरकुलाचे उद्दिष्ट होते, त्यापैकी 84 हजार 21 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 62 हजार 743 घरकुलांचे काम पुर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाच्या भौतिक प्रगतीनुसार टप्पानिहाय सर्व हप्ते किमान कालावधीत वितरीत करणे तसेच झालेल्या कामाचे आवास ॲपद्वारे टप्पानिहाय माहिती व छायाचित्र अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
याप्रसंगी महसुल, जिल्हा परिषद व ग्रामविकास यंत्रणा तसेच महाआवास योजनेशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.