मुंबई – देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत प्रारंभ

मुंबई :- ‘प्रगतीकडून पर्यावरण रक्षणाकडे’ (‘प्रगति से प्रकृति तक’) या मुंबई ते देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी (दि. २) राजभवन मुंबई येथून झेंडी दाखवून रवाना केले.

६७- वर्षीय ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि हिमालय पर्यावरण अध्ययन व संवर्धन संस्थेचे संस्थापक डॉ अनिल प्रकाश जोशी या सायकल यात्रेचे नेतृत्व करीत आहे. राज्यपालांच्या हस्ते रॅलीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले तसेच सहभागी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

सायकल यात्रेच्या आरंभ प्रसंगी अभिनेत्री हिमानी शिवपुरी, अभिनेते हेमंत पांडे, इंडियन आयडॉल विजेते गायक पवनदीप राजन, उद्योजक अनंत सिंघानिया, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ अब्राहम मथाई आदी उपस्थित होते.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते आज जग ज्वालामुखीवर उभे आहे. भारतीय तत्वज्ञानात निसर्गाच्या पाच तत्वांचा समतोल साधण्यावर भर दिला आहे. प्रत्येक शांतीमंत्रांमध्ये पृथ्वी, वनस्पती इत्यादी तत्वांच्या शांतीचा विचार मांडला आहे. विकास साधताना पर्यावरणाचा समतोल साधला गेल्यास शाश्वत विकास साधता येईल असे राज्यपालांनी सांगितले. पर्यावरण तज्ज्ञ डॉ. अनिल जोशी यांची यात्रा समुद्राकडून हिमालयाकडे अशी उन्नत मार्गाने जाणार असून त्यातून जनजागृती होईल अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

‘प्रगतीकडून पर्यावरणाकडे’ या सायकल यात्रेचा आरंभ देशातील सर्वात प्रगतिशील शहर असलेल्या मुंबई येथे होत असून देशाची पर्यावरण राजधानी असलेल्या उत्तराखंड येथे तिचा समारोप होणार आहे, असे डॉ. अनिल जोशी यांनी सांगितले. दरवर्षी जगात नवनवी विध्वंसक वादळे निर्माण होत आहेत. मनुष्याला विकास हवा आहे, रस्ते देखील हवे आहेत. अश्यावेळी विकास साधताना पर्यावरणाकडे नव्या दृष्टीने पाहावे लागेल असे डॉ. अनिल जोशी यांनी सांगितले.

कोविड सारख्या जागतिक आपत्तीच्या मुळाशी कोठेतरी निसर्गाप्रती माणसाचे चुकीचे वर्तन कारणीभूत आहे असे त्यांनी सांगितले. भावी पिढ्यांसाठी आपण घरे बांधीत आहोत, आर्थिक तरतूद करीत आहोत, परंतु मूलभूत गरजा असलेल्या पाणी, जमीन, हवा, जंगल याचा विचार करीत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतात पृथ्वी, जल, अग्नी यांची पूजा केली जाते त्यामुळे भारतच जगाला पर्यावरण रक्षणाचा विचार देऊ शकतो असे त्यांनी सांगितले. सकल घरगुती उत्पन्न (GDP) या ऐवजी सकल पर्यावरण उत्पन्न (GEP) या माध्यमातून विकास मोजला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सायकल यात्रेमध्ये १५ युवक युवती सहभागी झाले असून ही यात्रा ४० दिवसांमध्ये दहा हजार लोकांशी संपर्क साधेल व एक कोटी लोकांना निसर्ग रक्षणाचा संदेश देत २००० किमी अंतर पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com