पीक कर्ज वाटप येत्या दोन महिन्यात पूर्ण करा ; खरीप हंगाम आढावा बैठकीत विभागीय आयुक्त बिदरी यांचे निर्देश

Ø पीक नुकसान प्रलंबित निधी वाटप पूर्ण करा

Ø अनधिकृत कापूस बियाणे विक्री संदर्भात विभागात 9 गुन्हे दाखल

Ø दुष्काळ सदृष्य भागात शेतकऱ्यांना प्राधान्याने सवलती द्या

नागपूर :- खरीप हंगामात नागपूर विभागातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप लक्षांक जून महिन्याअखेर 70 टक्के आणि उर्वरित जूलै महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्ह्यांना दिले. ई-केवायसी व अन्य तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या पीक नुकसान भरपाई निधीचे तातडीने वाटप पूर्ण करा, दुष्काळ सदृष्य भागात शासनाने ठरवून दिलेल्या सवलती शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. विभागात अनधिकृत कापूस बियाणे विक्री संदर्भात 9 गुन्हे दाखल करुन १६५.५३ लाखांचा ७९.३४ क्विंटल साठा जप्त करण्यात आल्याचे बिदरी यांनी सांगितले.

बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागाचा खरीप हंगाम आढावा घेण्यात आला, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. विभागीय आयुक्तालयातील महसूल उपायुक्त दिपाली मोतीयेळे,विभागीय कृषी सहसंचालक शं.मा. तोटावार, यांच्यासह महावितरण, सिंचन विभाग, पाठबंधारे विभाग, कृषी व पणन मंडळ आदींचे अधिकारी उपस्थित होते. विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातून वरिष्ठ अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

चालू खरीप हंगामात आतापर्यंत २ लाख १४ हजार ८९७ शेतकऱ्यांना १८१९५२.११ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ५२४७०७.५८ कोटींच्या खरीप कर्ज वाटप लक्षांकापैकी जून महिन्याअखेर 70 टक्के आणि उर्वरित जूलै महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश बिदरी यांनी दिले. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी विभागातील 85 हजार 644 शेतकऱ्यांना द्यावयाचा निधी ई-केवायसी, बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे प्रलंबित आहे. महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांचे ई-केवायसी, बँक खाते आधार लिंक करुन घेत पीक नुकसान भरपाई निधीचे तातडीने वाटप पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

अनधिकृत कापूस बियाणे विक्री संदर्भात 9 गुन्हे दाखल

१६५.५३ लाखांचा ७९.३४ क्विंटल साठा जप्त

नागपूर विभागात खरीप हंगामातील अनधिकृत बियाणे, खते व किटकनाशकांबाबत कठोर कार्यवाही करण्यात आली. याअंतर्गत विभागात कापूस बियाणे विक्री संदर्भात एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यात १, वर्धा जिल्ह्यात १, चंद्रपूर जिल्ह्यात ६ व गडचिरोली जिल्ह्यात १ असे एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून १६५.५३ लाखांचा ७९.३४ क्विंटल साठा जप्त करण्यात आला आहे. रासायनिक खतासंबंधी नागपूर जिल्ह्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. याअंतर्गत १.७५ मेट्रिक टनाचा ५२ लाखांचा साठा जप्त करण्यात आला. विभागात कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी बियाण्यांचे २९ विक्रीबंद आदेश तर खतांचे ६ विक्रीबंद आदेश देण्यात आले आहेत.

बियाणे खरेदी व तक्रारी बाबत शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक

बियाणे खरेदी करतांना घ्यावयाच्या काळजी व तक्रारीबाबत नागपूर विभागातील सर्व कृषी केंद्रामध्ये टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० व मोबाईल तथा व्हाट्स ॲप क्रमांक ९३७३८२११७४ माहिती फलकाद्वारे प्रसिध्द करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

विभागात २०० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक

नागपूर विभागात २०० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीने विभाग स्तरावर १, जिल्हास्तरावर ६, तालुका स्तरावर ६३ असे एकूण ७० भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत. बियाण्यांचे ६५८ आणि खतांचे ३६५ तसेच कीटकनाशकाचे ४२ नमुने काढण्यात आले असून गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेत सादर करण्यात आले.

दुष्काळ सदृष्य भागात शेतकऱ्यांना प्राधान्याने सवलती

विभागातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यातील 15 तालुके आणि 34 मंडळामध्ये दुष्काळसदृष्य स्थिती असून शासनाने ठरवून दिलेल्या सवलती या भागात शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्याच्या सूचनाही श्रीमती बिदरी यांनी केल्या. या सवतली अंतर्गत जमीन महसूलात सूट देणे, सहकारी कर्जाचे पूर्नगठण करणे, शेतीची निगडीत कर्ज वसुलीस स्थगिती देणे, कृषी पंपाच्या चालू विज बिलात 33.5 टक्के सूट देणे, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देणे आदी 8 सवलती प्राधान्याने देण्याच्या सूचना  बिदरी यांनी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या हस्ते अत्याधुनिक ब्रेल प्रिंटिंग मशीनचे उदघाटन

Thu Jun 13 , 2024
– दृष्टिबाधितांच्या सक्षमीकरणासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे: राज्यपाल रमेश बैस मुंबई :- नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड – ‘नॅब’ – संस्थेने ब्रेल पुस्तक छपाईसाठी खरेदी केलेल्या अत्याधुनिक ‘ब्रेलो 300’ या प्रिंटिंग मशीनचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. १२) संस्थेच्या वरळी येथील मुख्यालयात करण्यात आले. राज्यपालांनी दिलेल्या स्वेच्छा निधीतून खरेदी केलेल्या या छपाई मशीनमुळे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी क्रमिक पुस्तके, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!