– विविध मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपुरात धरणे आंदोलन
नागपूर :- शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सभागृहात मांडून सोडविण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून, प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी आंदोलनाप्रसंगी दिली.
राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व खाजगी अनुदानित विजाभज / आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. प्रलंबित समस्या सोडविण्याकरीता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या मार्गदर्शनात व विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले, अध्यक्ष अरविंद देशमुख यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियम, नागपूर येथे १९ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राज्यातील सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर व राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेंशन योजना लागू करावी, विना अनुदानित/अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार १००% अनुदान मंजूर करण्यात यावे, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय, दि. १५ मार्च २०२४ यातील संचमान्यतेबाबत जाचक अटी रद्द करण्यात याव्या, राज्यातील अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकडयांना अनुदानास पात्र घोषित करून आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, न्यायालयीन आदेशाप्रमाणे नागपूर विभागातील आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करणाऱ्या विजाभज आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता व एकस्तर वेतनश्रेणी योजनेचे लाभ पूर्ववत सुरू करण्यात यावे, न्यायालयीन आदेशाप्रमानुसार आदिवासी विकास विभागाअंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आलेल्या ११५५ शिक्षकांना मानधन वेतनाची थकबाकी अदा करण्यात यावी, दत्तक शाळा योजना राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा शासन निर्णय दिनांक २३ ऑगष्ट २०२४ नुसार शिक्षकांची अशैक्षणिक कामांतून मुक्तता करण्यात यावी. तसेच सदर शासन निर्णयाची अमंलबजावणी करण्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.
या धरणे आंदोलनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय पदाधिकारी, जिल्हा, तालुका पदाधिकारी व विदर्भातील विविध विभागाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येेने सहभागी झाले होते.
सदर आंदोलनातील मागण्यांचे निवेदन मंत्री नाम. अतुल सावे यांना प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे यांनी विधानभवनात दिले.