भंडारा : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय तसेच भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी दिवाणी व फौजदारी न्यायालयांमध्ये येत्या 11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. पक्षकारांनी आपली तडजोड पात्र प्रकरणे मोठ्या संख्येने लोक अदालतीमध्ये निकाली काढावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंजू शेंडे यांनी केले आहे.
न्यायालयात दाखल असलेली सर्व तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, दिवाणी दावे तसेच दाखलपूर्व तडजोड पात्र प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुका न्यायालयामध्येही लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र फौजदारी, एन.आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची कर्ज वसूली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे.
पक्षकारांनी आपली प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित न्यायालयात अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले यांनी केले आहे.