चला! जाणून घेऊ या संरक्षण दलाची सज्जता आणि सक्षमता ,एकदा अवश्य भेट द्या…डीआरडीओच्या दालनाला  

नागपूर  : आपले संरक्षण दल व त्याच्या वेगवेगळ्या शाखा अखंडपणे देश संरक्षणासाठी सज्ज असतात. मात्र ही सज्जता, सक्षमता आणि आक्रमकता येते ती विज्ञान आणि तंत्रज्ञानातुन. या विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवनवीन शोधाचे प्रात्यक्षिक दाखवणारे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना विभागाचे (डीआरडीओ) दालन इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे.

संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रयोग व त्याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. दालनाच्या सुरुवातीला आकर्षक ड्रोण ठेवण्यात आला आहे. पाच किलो वजनाचा हा ड्रोण शत्रूच्या सीमेत घुसून पाच किलोमिटर परीसरात टेहळणी करू शकतो. युद्ध काळात मानव विरहीत टेहळणी करणारा ड्रोण सध्या युद्धनीतीमध्ये माहिती गोळा करणारे यंत्र म्हणून प्रामुख्याने वापरल्या जाते. लग्नामध्ये शुटींग करण्यासाठी, क्वचित प्रसंगी शहरात पोलिसांनी वापरलेला ड्रोण आपण बघितला असेल मात्र हा ड्रोण अधिक सक्षम असून त्यांच्या उच्च क्षमतेची माहिती या ठिकाणी मिळते.

याच दालनात अन्य एका स्टॉलवर ‘कन्फाईंड स्पेस रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल’ नावाचे अद्भुत यंत्र आहे. हे यंत्र जमिनीवर कुठेही दडवलेले स्फोटक शोधून काढते. एवढेच नव्हे तर पायऱ्या चढून स्वतःच स्फोटके लपवलेली बॅग शोधू शकते. स्फोटक शोधणे, उचलणे, स्फोटक जिवंत आहे अथवा नाहीत याचे विश्लेषण करणे. वेळ नसेल तर त्याच ठिकाणी स्फोटक निकामी करते. अशा पद्धतीचे केवळ रिमोट वर चालणारे हे यंत्र असून अडचणीच्या ठिकाणी ठेवलेले स्फोटक शोधून काढण्याचे कौशल्य हे त्याचे वैशिष्टय आहे. मानवाच्या प्रतिकृतीत तसेच छोट्या खेळण्याच्या आकारात हे यंत्र लक्ष वेधून घेते.

समुद्राच्या तळाशी पाणबुडीच्या युद्धाचे अनेक चित्रपट आपण बघितले असतील. मात्र ‘सबमरीन सोनार सिस्टम’ काय असते,याची माहिती सगळ्यांना नाही. समुद्राच्या पोटात अनेक हालचाली होत असतात त्यांचे तांत्रिक विश्लेषण ही यंत्रणा करते. समुद्रात निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरी वरून नेमके अंतर कसे काढायचे, त्याचे विश्लेषण कसे करायचे, या विश्लेषणाचे नेमकेपणा कसा असतो, याबाबतची माहिती या ठिकाणी दिली जाते. दिशा ठरवणे आणि अंतर ठरवणे अशी विभागणी सोनार सिस्टममध्ये केली असते. सैनिकी कारवाया, नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करताना हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या स्वरूपात वापरले जाते. 

या ठिकाणी आणखी एक दालन ‘डिफेन्स जिओ इन्फॉर्मेटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट’ चंदीगड येथील संस्थेच्या कामकाजाची माहिती देते. ही संस्था हिमालयामध्ये निर्माण होणाऱ्या हिम वादळासंदर्भात विश्लेषण देते. हिम वादळ निर्माण होणार अथवा कसे?यासंदर्भात सैन्यदलास माहिती देण्याचे काम ही संस्था करते. हिमालयामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या क्षमतेचे बर्फाचे वादळ निर्माण होऊ शकते; याची कल्पना या संस्थेमार्फत दिली जाते. याशिवाय क्षेपणास्त्रांबाबतची अनेक दालने या ठिकाणी आहेत. यामध्ये मध्यम परिणामकारक मारा करणारे क्षेपणास्त्र व त्याची वैशिष्ट्ये सांगितली जातात. हवेतून हवेत मारा, हवेतून टॅंक निकामी करणारे, दीर्घ अंतरावर मारा करणारे अनेक क्षेपणास्त्र येथे प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी बस स्टँड चौकातून 750 ग्राम गांजा जप्त 

Thu Jan 5 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 5 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी बस स्टँड चौकात एका तरुणाजवळ गांजा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून सदर तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 750 ग्राम किमती 7 हजार 500 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला तसेच एक मोबाईल किमती 1 हजार रुपये व गांजा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!