– विविध संस्था,शाळा,महाविद्यालये, समितीचा सहभाग
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत रविवार १ नोव्हेंबर रोजी ” एक तास एक साथ ” महाअभियान आयुक्त विपीन पालीवाल यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले. शहरात ६० ठिकाणी एकाचवेळी मनपा अधिकारी कर्मचारी,विविध संस्था,शाळा,महाविद्यालये, विविध समिती व नागरीकांच्या मदतीने १ तास श्रमदानाद्वारे स्वच्छता करण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून १ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे केंद्र शासनाचे निर्देश होते.
त्यानुसार जटपुरा गेट,रामाळा तलाव,महाकाली मंदिर परिसर,झरपट नदी,तुकूमगेट,वडगाव,,शास्त्रीनगर, विवेक नगर,एम.ई.एल,बंगाली कॅम्प,इंडस्ट्रीयल इस्टेट,बाबुपेठ, नगिनाबाग,एकोरी मंदिर भानापेठ, विठ्ठल मंदिर,भिवापुर, लालपेठ कॉलरी इत्यादी एकुण ६० सार्वजनिक परीसरात स्वच्छता करण्याचे नियोजन मनपातर्फे करण्यात आले होते.
मोहीमेत मनपा अधिकारी कर्मचारी,स्वयंसेवी संस्था,शालेय विद्यार्थी – शिक्षक व नागरीकांच्या मदतीने १७ प्रभाग व ४३ इतर जागी स्वयंसेवी संस्था, शाळा महाविद्यालये यांच्या मदतीने स्वच्छता करण्यात आली.मनपाच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातही स्वच्छतेसह शपथ घेण्यात आली.सर्व स्थानांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या बॅनरवर नागरीकांनी स्वाक्षरी करून स्वच्छता अभियानातील आपला सहभाग दर्शविला.
या उपक्रमात माजी पदाधिकारी,स्वयंसेवी संस्था,विविध उद्यान व ओपन स्पेस विकास समिती,शाळा,महाविद्यालये यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी रामाळा तलावातील इकॉर्निया काढण्यात येऊन परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छते बरोबरच, वृक्षलागवड व उपलब्ध जागी पेंटींग सुद्धा करण्यात आली व क्विझ कॉन्टेस्ट घेण्यात येऊन ईश्वरचिट्ठीद्वारे विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात येऊन मोहीमेत भाग घेतलेल्या नागरीकांना प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त अशोक गराटे,सर्व सहायक आयुक्त, विभागप्रमुख व मनपाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.