नागपूर :- दि. 20 व 28 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) सन 2023 ची पुरवणी परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार दि. 2 व 3 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) सन 2023 ची पुरवणी परीक्षा यापूर्वी दि. 20 व 28 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने राज्य शासनाने या दिवसांमध्ये शाळांना सुटी जाहीर केली होती. त्यामुळे पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार दि. 20 व 28 जुलै रोजी आयोजित करता न आलेली परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार दि. 2 व 3 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. बदललेल्या वेळापत्रकानुसार कार्यकक्षेतील सर्व परिरक्षक, केंद्र संचालक, विद्यार्थी व पालक यांनी संबंधित नोंद घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.