– स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंतीनिमित्त आयोजन
नागपूर, ता. २३ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५वी जयंतीच्या अनुषंगाने महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरातील ७५ कलावंतांनी गांधीसागर तलावाजवळील तीन मार्गांवर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर भारताचे चित्र रेखाटले. रमन विज्ञान केंद्र, टाटा पारसी मुलींची शाळा आणि लोकमान्य टिळक पुतळा ते गांधीगेट या तीन मार्गांवर रविवारी (ता.२३) शहरातील कलावंत साकारत असलेल्या कलाकृती लक्ष वेधून घेत होत्या. कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून गांधीसागर तलावालगतच्या तीन रोडवर प्रत्येकी २५ याप्रमाणे कलावंतांचे गट करून त्यांना योग्य अंतरासह त्यांच्या कला साकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिनही मार्गांवर करण्यात आलेल्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे या मार्गांवरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला नाही.
महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, शिक्षण समिती उपसभापती सुमेधा देशपांडे, नगरसेवक संजय बालपांडे, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेत कॅप्टन म्हणून धुरा सांभाळलेले स्वातंत्र्य सेनानी गोविंदरावजी किरडे यांच्या परिवारातील सुरेश किरडे, सुवर्णा किरडे, नरेंद्र बारई, शेखर वानस्कर, श्रीकांत गडकरी, प्रकाश जिल्हारे, राजकुमार कावळे, प्रफुल्ल चरडे आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी कॅनव्हॉसवर कुंचल्याच्या माध्यमातून ‘वंदे मातरम्’, ’जय हिंद’, ’भारत माता की जय’ असे घोषवाक्य लिहुन उपक्रमाचा प्रारंभ केला.
याप्रसंगी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी यांनी या उपक्रमाची संकल्पना विषद केली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर शहरामध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच श्रृंखलेमध्ये शहरातील ७५ कलावंतांनी ७५ मीटरच्या कॅनव्हॉसवर एकाचवेळी देशाच्या स्वातंत्र्यपूर्वीच्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या स्थितीवर चित्र साकारावे ही संकल्पना पुढे आली. मात्र कोरोनाच्या संक्रमनाचा धोका लक्षात घेउन कलावंतांचे तीन गट करून तीन मार्गांवर वेगवेगळ्या कॅनव्हॉसवर त्यांची व्यवस्था करण्यात आली.
१९४७चा स्वातंत्र्य संग्राम आणि १९४७ नंतर देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सैनिक आणि सरकारने निभावलेली भूमिका हे आपल्या कुंचल्यातून साकारण्याचे काम यावेळी कलावंतांनी केले. शहरातील ७५ कलाकारांनी साकारलेली ही कलाकृती नागपूर शहरातील जनतेला पाहता यावी यासाठी दर्शनीय स्थळी लावण्यात येणार आहे. या कलाकृतीच्या माध्यमातून शहरातील विद्यार्थी, युवा, नागरिक, ज्येष्ठ या सर्वांनाच देशाभिमानाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या अभिनव उपक्रमात शहरातील कलावंतांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. दर्शन उदोले, विजय पाटणकर, गौरी नानोटकर, उर्वशी कडव, अवंतिका घोरा, पूजा बोडखे, योगेश हेडाऊ, राहुल गुप्ता, रोहित वाघमारे, आदित्य वाघमारे, धनश्री गिरडे, सागर कामकिरड, संस्कृती वाघाडे, अनुराग मानकर, विजया बारापात्रे, अमोल हिवसकर, निलेश वरभे, सदानंदा चौधरी, स्वप्नील रामगडे, विशाल सोरते, दीपक तांदुरकर, सुर्यकांत भोसकर, विकास ढोबळे, रूची मेश्राम, विक्की सुर्यवंशी, विनोद सावलकर, प्रेरणा गेडाम, श्रुती सामंत, शुभम टिंगणे, विनायक निट्टुरकर, आसावरी पुसदकर, पारस साठवणे, राजेंद्र भुते, राजकुमार कावळे, गिरीश हरडे, अभय गुरव, नीता गडेकर, कल्पना गुलालकर, प्रगती सरडे, अलका वंजारी, संस्कृती जिचकार, किशोर सोनटक्के, सुवर्णा खडतकर, हरीश्चंद्र ढोबळे, संजय पळसकर, संजय धात्रक, जयंत आंबटकर, बाबर शरीफ, मनोज भानुसे, कौशल औतकर, राजीव निमजे, अर्चना सिरसे, अलका वाघमारे, अलीजा खान, सानीया शेख, अनुकूल पालकृत, डॉ.बाभुळकर, प्रा.गणेश बोबडे, डॉ. किशोर इंगळे, नितीन जुनघरे, विशाल सोरटे, कविता सोरटे, अतुल तांबे, समिक्षा गोरले, नाना मिसाळ, मनोज साहु, कंचन प्रजापती, रवी खंडाईत, अस्मिता ठाकुर, प्रशिक घरडे, आकाश नागोसे, विकास जोशी, आदिती मराठे, रोहित महादुरे विशाखा इसापरे, विजय कुमार या कलावंतांनी उपक्रमात सहभागी होऊन आपल्या उत्तमोत्तम रचना साकारून देशाविषयी भावना प्रकट केल्या. सर्व सहभागी कलावंतांचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी तुळशी रोप देऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.