यवतमाळ :- महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा, कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करणे, महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनविण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 58 हजार महिलांची नोंदणी झाली आहे.
शासनाने शासन निर्णय जारी करून या योजनेचे दिशा निर्देश, कक्षा, व्याप्ती, लाभाचे स्वरूप व लाभासाठी आवश्यक अटी शर्ती ठरविल्यानंतर योजना अधिक व्यापक आणि सुटसुटीत होण्यासाठी अनेक बदल केले आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत बहुतांश महिला योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना त्यांच्या आधार लिंक बॅंक खात्यात डीबीटीद्वारे प्रत्येक महिन्यास 1 हजार 500 रुपयांचे आर्थिक सहाय्य जमा केले जाणार आहे.
योजनेच्या लाभासाठी महिला 21 ते 65 वर्ष वयोगटातील असावी. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहीत महिला योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. लाभार्थी महिला राज्यातील रहिवासी असावी, लाभार्थी महिलेल्या कुटुंबांचे वार्षिक उत्तन्न 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. तसा उत्पन्न दाखल सादर करावा लागतो. परंतू पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रापासून सूट देण्यात आली आहे.
योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारल्या जात आहे. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येतील.
परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र किंवा पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदान कार्ड देखील ग्राह्य धरल्या जातील. लाभार्थी महिलेच्या कुटुंब प्रमुखाचा 2 लाख 50 हजाराच्या आतील उत्पन्नाचा दाखला, बॅंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॅाक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड आदी कागदपत्र नोंदणीच्यावेळी सादर करावे लागतात.
यवतमाळ जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 58 हजार महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. ग्रामस्तरावर लाभार्थी महिला अंगणवाडी सेविकेद्वारे नारी शक्ती दूत ॲपवरून ऑनलाईन नोंदणी करू शकतात किंवा ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारल्या जात आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक गतीमान होण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, जीवनोन्नती अभियानाचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.