मराठा समाजाच्या शैक्षणिक-आर्थिक विकासासाठी प्रयत्नशील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाच्यावतीने मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांचा सत्कार

नागपूर : मराठा समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. सामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करत सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्री शिंदे उत्तर देत होते. स्वामी जितेंद्रनाथ महाराज हे या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. 

येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आज सायंकाळी हा सोहळा पार पडला. विधान परिषद सदस्य आ. प्रवीण दटके, राजे डॉ. मुधोजी भोसले, राजे संग्रामसिंह भोसले,श्रीकांत शिंदे, शिरीष राजेशिर्के, नरेंद्र मोहिते, दिलीप धंद्रे, दीपक देशमुख आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास माल्यार्पण करुन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. मराठा समाज व मराठा समाजाशी संबंधित प्रत्येक जिल्ह्यातील संघटना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला.

सत्काराला उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा, स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व.आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनात वाटचाल करीत आहे. सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री ही सेवेची संधी मला मिळाली. मला मिळालेली संधी ही सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. आपला माणूस म्हणून लोक माझ्याकडे बघतात. राज्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यामुळे आमचे सरकार हे सामान्यांच्या मनातले सरकार आहे,असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी शासनाने अनेक योजना सुरु केल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या न्यायालयीन लढाईसाठी शासन सज्ज आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कर्ज योजना, तसेच शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आल्या असून विद्यार्थी- विद्यार्थिनींना सहाय्य करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा तरुण नोकरी देणारा व्हावा- उपमुख्यमंत्री फडणवीस

मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांद्वारे भांडवल दिले जात आहे. मराठा युवकांचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक असून अनेकांचे उद्योग यशस्वीरित्या सुरु आहेत. मराठा समाजातील तरुण हा नोकरी देणारा व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

 

त्यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकीकडे शासन कायदेशीर लढाई लढत आहे. त्यासोबतच उद्योजकतेला वाव देणाऱ्या योजना, वसतीगृह योजना, निर्वाह भत्ता योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून मराठा युवक युवतींना न्याय देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. मराठा समाजाच्यावतीने 12 मागण्यांचे निवेदन राजे डॉ. मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मी नागपूरकर या नात्याने तुमचा वकील म्हणून काम करायला तयार आहे, असे फडणवीस यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

अध्यक्षीय समारोपात जितेंद्रनाथ महाराज म्हणाले की, रिती आणि नितीने चालणारे हे सरकार राज्यातील जनतेला न्याय देईल. हे राज्य सांभाळण्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचे पालन त्यांच्याकडून होवो, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

सुत्रसंचालन डॉ.चंद्रकांत शिंदे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच रांगोळी आदी सजावट करणाऱ्या कलावंतांचा मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एनसीपी नेता ने CM समेत पूरे मंत्रिमंडल पर साधा निशाना

Tue Dec 20 , 2022
– अजित पवार ने कहा कि सदन में मंत्रियों को किसी पार्टी का बिल्ला लगाकर नहीं आना चाहिए नागपुर :- नागपुर (Nagpur) में चल रहे महाराष्ट्र विधानसभा के शीतकालीन अधिवेशन सत्र के पहले दिन ही राज्य के पूर्व उपमुख्यमंत्री और एनसीपी (NCP) नेता अजित पवार ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समेत उनके पूरे मंत्रिमंडल की जमकर क्लास ली। राज्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com