– छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती भेट
नवी दिल्ली :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7 लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती पंतप्रधान मोदी यांना भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर, फडणवीस यांनी महाराष्ट्र सदन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती पंतप्रधान मोदी यांना भेट दिल्याबाबतच्या भावना व्यक्त करत, मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वावर प्रकाश टाकत, पंतप्रधान मोदी यांची शिवाजी महाराजांवर अपार श्रद्धा असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली निष्ठा आणि आदरभाव व्यक्त केल्याचीही माहिती त्यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींना दिली.
या भेटी दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकास योजनांबाबत पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केल्याबाबत सांगितले. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य असल्याचे सांगत, राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून सर्वत्तोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील मूल्ये आणि त्यांचे प्रेरणादायी नेतृत्वाबद्दल माध्यमांशी संवाद साधताना, पंतप्रधान मोदींनी वर्ष 2014 मध्ये रायगडावरून निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान श्री.मोदी यांचे मार्गदर्शन आणि प्रेम हे महाराष्ट्राला सतत प्रेरणा देत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
या दोन दिवसीय दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांच्याही सदिच्छा भेटी घेतल्या. या भेटी मध्ये राज्याच्या विकासासाठी विविध योजनांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.