राज्यात आजपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई :- कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत शनिवार 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक समुपदेशन केले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी, युवक-युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे व बदलत्या काळास अनुसरुन ठिकठिकाणी सुरु झालेल्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन मंत्री  लोढा यांनी केले आहे.

सर्व जिल्ह्यांमध्ये नियोजित ठिकाणी शिबीरांचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या करिअर शिबीरांच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक-युवती व पालकांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. करिअर शिबीराच्या ठिकाणी विविध स्टॉलच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. इयत्ता दहावीनंतर करिअर कसे निवडावे, दहावी नंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी, बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यासोबतच इतर विविध विषयांबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रम, इंजीनियरिंग व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व त्यातील विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयक विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगारविषयक विविध योजना, स्थानिक शैक्षणिक संस्था, परदेशातील उच्च शिक्षण आदींविषयी मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

या संधीचा लाभ घेण्यासाठी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी (आयटीआय) संपर्क साधावा, तसेच सोबत जोडलेल्या क्यूआर कोड (QR CODE) च्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, युवक-युवतींनी नोंदणी करून शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांनी केले आहे.

मुंबईत कुर्ला येथे आयोजन

छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे उद्या शनिवार दिनांक 6 मे रोजी कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भविष्यात रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याबाबत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून 8 हजारांहून अधिक रुग्णांना 60कोटी 48 लाखांची आर्थिक मदत

Sat May 6 , 2023
मुंबई :- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या 10 महिन्यांत 8 हजार 192 रुग्णांना एकूण 60 कोटी 48 लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com